Breaking News

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीसह मच्छी-मटण मार्केट बंद

पनवेल ः प्रतिनिधी, वार्ताहर

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील गर्दीची ठिकाणे असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलसह कोळीवाडा परिसरातील मच्छी व मटण मार्केट बुधवारपासून (दि. 1) पुढील आदेश मिळेपर्यंत बंद करण्याचे आदेश पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका आयुक्तांकडे याबाबतची मागणी केली होती.

जगभरात पसरलेल्या कोरोना रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या. त्या दृष्टीने शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020पासून लागू करून खंड 2, 3 व 4मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग घोषित केला. त्या अनुषंगाने कोरोना विषाणू संक्रमण वाढणार नाही या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण व्यवस्था व नियोजन करण्याकरिता स्वतंत्र अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करणे आवश्यक आहे. याकरिता पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोरोनाचा प्रसार व संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल येथील सर्व भाजी मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच या ठिकाणचे मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेच्या पदाधिकार्‍यांची राहणार असून या आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांविरुद्ध साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 अन्वये कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply