चार दिवसांपूर्वी संपलेल्या लोकसभा निवडणूकीचे निकाल समोर आल्यावर नुसती राजकीय पक्षांचीच झोप उडालेली नाही, तर आपल्याला राजकीय पंडित समजून वावरणार्या अनेकांची भंबेरी उडाली आहे. कारण राज्यात पुन्हा तितक्याच ताकदीने भाजपा शिवसेना युती जिंकण्याची अपेक्षा कोणी केलेली नव्हती. त्याहीपेक्षा नुसत्या देखाव्याला भुलून राजकीय आकलन व विश्लेषण करणार्यांना; या निकालांनी तोंडघशी पाडलेले आहे. प्रामुख्याने या निवडणूकीतला एक चमत्कार असा होता, की अन्य कुठल्या लढणार्या पक्षापेक्षाही लढतीमध्ये नसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने, सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेले होते. त्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा जितक्या गाजल्या, तितक्या अन्य कुठल्या पक्षाच्या नेत्यांना वा प्रचाराला माध्यमातून स्थान मिळाले नाही. ‘लावरे तो व्हिडीओ’हे राज ठाकरेंचे अशा सभांमधले शब्द परवलीचे होऊन गेले. त्यामुळे सत्ताधारी सेना भाजपा नेत्यांचेही धाबे दणाणले होते, यात शंका नाही. पण त्यापेक्षाही माध्यमांचे डोळे इतके दिपून गेले, की त्यांना अन्य कही दिसूही शकलेले नव्हते. मनसेला मिळालेल्या प्रसिद्धीझोताने तोवर राजकीय परिघ व्यापून बसलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहूजन आघाडीलाही लोक दुर्लक्षित करून बसले होते. मात्र प्रचार व मतदान संपून गेल्यावर तीन आठवड्यांनी मतमोजणी असल्याने, अशा गदारोळातून काय निष्पन्न झाले, त्याचा ताळेबंद लगेच मिळू शकला नाही. कारण राजच्या भाषणांनी कॉग्रेस राष्ट्रवादीला अपेक्षित असलेला कुठलाही लाभ मिळू शकला नाही. उलटा वंचित बहुजन आघाडीच्या मतांनी अनेकजागी कॉग्रेसला पुरते भूईसपाट करून टाकले. पण त्यात मनसेचा कुठलाच करिष्मा नसेल काय? राजनी मागितलेली मते कुठे व कोणाकडे गेली मग? कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडीने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला काय?
राज ठाकरे यांनी दहा भव्यदिव्य सभा घेतल्या आणि त्यांच्या व्हिडीओं दाखवण्याचे खुप कौतुक झाले. पण ज्या दहा सभा झाल्या, त्यापैकी तीन मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार जिंकून आले. मग त्याचे श्रेय मनसेला द्यायचे काय? कारण तिथे राजच्या मोठमोठ्या सभा झालेल्या होत्या. पण योगायोग असा, की त्यापैकी सर्व जागी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार दणकट होते आणि राजमुळे त्यांना लाभ मिळाला, असा छातीठोक दावा कोणी करू शकत नाही. कुठल्याही प्रभावाशिवाय सातारा येथून छत्रपती उदयन राजे अनेकदा निवडून आलेले आहेत. बारामतीमध्ये पवारांना राजच्या सभेची गरज होती, असे खुद्द राजही म्हणू शकत नाहीत. तिसरी जागा रायगडची आहे. गेल्या खेपेस तिथून शिवसेनेचे अनंत गीते किरकोळ फ़रकाने जिंकले होते. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी मोदीलाटेतही चांगली झुंज दिलेली होती. यावेळी त्यापेक्षाही अधिक तयारीने तटकरे मैदानात उतरलेले होते. बाकी अन्य सात जागी राजनी घेतलेल्या सभेचा कितीसा लाभ होऊ शकला? मागल्या मोदी लाटेतही नांदेड येथून कॉग्रेसचा गड राखलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी पडले आणि तीच गत आणखी एक मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूरात झाली. या दोन्ही जागी राजनी सभा घेतल्या होत्या. ठाणे मुंबईतही त्यांच्या सभा झाल्या. पण मतांवर परिणाम झाला व कॉग्रेसला लाभ झाला, असे म्हणता येत नाही. मग भाजपा म्हणतो, तसा तो निव्वळ मनोरंजनाचा कार्यक्रम होता का? निदान मला तरी असे वाटत नाही. राज यांनी हिरीरीने मोदी-शहा विरोधात आघाडी उघडलेली होती आणि तिला प्रेक्षक श्रोत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळालेला होता. पुढे त्यांच्या अनुयायांनी राष्ट्रवादी व कॉग्रेस उमेदवारांच्या खांद्याला खांदा लावून मतदारसंघात कामही केले. पण प्रत्यक्ष मतदानात त्याचे प्रतिबिंब कुठेही पडलेले नाही. मग राज-मते गेली कुठे?
गर्दी जमवली वा जमली, म्हणून मते मिळतात असे नाही. समोरची गर्दी मतांमध्ये परिवर्तित होतेच असे नाही. निदान राजकीय जाणकारांचे तसे मत आहे. त्यामध्ये तथ्य नाही असे कोणी म्हणू शकत नाही. पण अशा भाषणांनी जो मतदार भारावतो, त्याला मत द्यायचे असल्यास आवाहन करणार्या पक्षाचा प्रतिनिधी उमेदवारही मैदानात असावा लागतो. मनसेचा उमेदवार कुठेच नव्हता आणि स्वबळावर काही जिंकण्याची राज यांची अपेक्षाही नव्हती. अन्यथा त्यांनी आपले लढवय्ये मैदानात आणले असते. पण त्यांनी नुसत्या सभा गाजवल्या आणि त्यांच्याकडे झुकणार्या मतदाराला वार्यावर सोडून दिले. म्हणून तर निकालानंतर त्यांचेच बोललेले शब्द काहीसे टिंगलीचा विषय झाले. पण म्हणून त्या गाजलेल्या सभांचे महत्व संपत नाही. त्यातून राजनी धाडलेला संदेश व संकेत संपत नाही. त्यांनी समाजातील कट्टर मोदी द्वेषी मतदाराच्या काळजाला हात घातला, हे कोणी नाकारू शकत नाही. मात्र त्या मतदाराला मत देण्याची सुविधा मनसेने उपलब्ध करून दिलेली नव्हती, अशा मतदाराने मग कोणाच्या तोंडाकडे बघावे? राजनी एकदाही कॉग्रेस वा राष्ट्रवादीला मत द्यावे, असे आवाहन केलेले नव्हते आणि त्यांच्यावर राजी असलेला सगळाच्या सगळा मतदार त्या दोन्ही पक्षांकडे वळण्याची बिलकुल शक्यता नव्हती. पण असा मोठा सेना भाजपा विरोधी मतदार घटक आहे आणि त्याला कॉग्रेस वा राष्ट्रवादी हे पर्याय वाटत नाहीत. तो मतदार आपल्या पद्धतीने पर्यायाची चाचपणी करीत असतो आणि त्यालाच राजनी आपल्या सभांमधून आकर्षित केलेले आहे. त्याने यावेळी कुठे मत द्यावे, असे राजनी सांगितले नाही. म्हणजेच तो पर्याय कॉग्रेस आघाडी असल्याचेही स्पष्ट केलेले नव्हते. अशावेळी तिसरा पर्याय उपलब्ध असेल तर मतदार तिकडे वळतो आणि यावेळी असा तिसरा पर्याय वंचित बहूजन आघाडी असा होता.
वास्तविक या आघाडीला कुठलाही मतदार गठ्ठा उपलब्ध नाही. आताही झालेल्या मतदानात ओवायसी यांच्या पक्षाला पाऊण टक्का मते आहेत आणि वंचित आघाडीला सात टक्क्याहून अधिक मते आहेत. याचे गणित कसे मांडायचे? मागल्या अनेक निवडणूकांमध्ये आंबेडकर गटाची एकदिड टक्का मते दिसलेली आहे. यावेळी मात्र त्यांच्या आघाडीला सात टक्क्याहून अधिक मते मिळालेली आहे. म्हणजे ही साडेचार टक्के मतांची वाढ, इतर पक्षांकडून आलेली आहे आणि त्यातला एक हिस्सा मनसे व दुसरा अन्य गलितगात्र पक्षांकडून आलेला आहे. मरगळलेले मार्क्सवादी वा लढायची कुवत हरवून बसलेला शेकाप, यांची मते वंचित आघाडीकडे वळली आहेत. गेल्या लोकसभेतला एक मोठा घटक आम आदमी पक्ष होता. त्याचा पाठीराखा आज अनाथ होता आणि तोही मनाने कॉग्रेस सेना भाजपा यांचा विरोधक आहे. त्यानेही आपला मोर्चा वंचित आघाडीकडे वळवला तर नवल नाही. म्हणूनच अर्ध्याअधिक मतदारसंघात या आघाडीने तिसरा पर्याय म्हणून भरघोस मते मिळवलेली आहेत. अनेकदा एक पक्ष वा नेता आवडतो, म्हणून मतदार तुम्हाला कल देत असतो. तसाच अन्य कोणाशी तुम्ही झुंज देता म्हणून तुमच्याकडे वळणाराही मतदार घटक असतो. अशाच अनेक लहानसहान घटकांची बेरीज तिसरा पर्याय म्हणून वंचित आघाडीकडे आलेली दिसते. म्हणून ती जशीच्या तशी प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीची मते असल्याचे मानण्यात अर्थ नाही. पण यातला एक मोठा घटक मनसेचा मुळचा राजनिष्ठ मतदार आहे आणि त्याच्याखेरीज कडवा मोदी विरोधक अनाथ मतदारही आहे. त्याला या निमीत्ताने राज ठाकरे नावाचा प्रेषित भेटलेला आहे. अशा मतदाराला गोळा करण्याचाच प्रयोग राजनी केलेला होता. त्यातला काही भाग कॉग्रेस राष्ट्रवादीकडे गेला आहे, तसा़च मोठा हिस्सा वंचित आघाडीकडे गेला आहे.
मध्यमवर्गिय जसे अनेक बॅन्का पतपेढ्यांमध्ये मुदतबंद ठेवींमध्ये आपली बचत राखून ठेवतात आणि अडचणीच्या प्रसंगी ते पैसे बाहेर काढतात, तशीच काहीशी बेगमी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकांच्या सभेतून केली असे म्हणता येईल. त्यांनी अशा कडव्या मोदी विरोधी मतदाराला आपल्या आक्रमक नेतृत्वाची साक्ष मोठ्या सभांतून दिलेली आहे आणि त्यांच्यासमोर व्यवहारी विरोधक असलेले कॉग्रेस राष्ट्रवादीही फ़िके पडलेले आहेत. तेवढ्या भांडवलावर मनसे आपला संसार नव्याने मांडू शकेल. मागल्या खेपेस आम आदमी पक्षाला मिळालेली मते नव्याने जन्माला आलेल्यांची नव्हती. तर आधीच्याच बारगळलेल्या पक्षातल्या निराश मतदारांची ती बेरीज होती. अशा इतर पक्षातून पांगलेल्या हताश मतदाराला गोळा करूनच नवा पक्ष आपला पाया घालत असतो. लोकसभा निवडणुकीत राजनी त्याच दिशेने डावपेच खेळले असतील, तर त्याची भरपाई प्रत्यक्षात कॉग्रेस राष्ट्रवादीला अनेक जागा गमावून करावी लागली असेल. कारण वंचित आघाडीने मिळवलेल्या मतांमुळे नऊ जागी या दोन प्रमुख पक्षांचे उमेदवार पराभूत झालेले आहेत. दहापंधरा जागी आघाडीला लाखाहून अधिक मते मिळालेली आहेत. ही मते आघाडीतल्या दोन पक्षांची हक्काची मते नाहीत. विविध पक्षांकडे विखुरलेल्या मतांची बेरीज त्यात मिळू शकते. अशा मतदाराला खमक्या आक्रमक नेता हवा असतो आणि राजनी आपल्याला त्याच रुपात पेश करण्याची संधी या निमीत्ताने घेतलेली आहे. विधानसभेचे वेध लागले, मग त्यातली गंमत सगळ्यांच्या लक्षात येईल. त्याचा कुठलाही फ़टका भाजपा किंवा शिवसेनेला बसणार नसून कॉग्रेस राष्ट्रवादी व वंचित आघाडीलाच बसू शकेल. किंबहूना मनसेच्या आक्रमक प्रचारानेच आघाडीला इतकी भरघोस मते मिळालेली आहेत. ह्या निवडणूकीने राष्ट्रीय राजकारणातून अनेक नेत्यांना मोडीत काढले. विधानसभेत राज्यातील अनेक जुनेपुराणे नेते व पक्ष मनसे मोडीत काढणार आहे.
-भाऊ तोरसेकर (मो. क्र. 9702134624)