Breaking News

खोपोली नगरपालिका शाळांत तुटलेली खेळणी

खोपोली : प्रतिनिधी

शंभर कोटीपेक्षा अधिक वार्षिक बजेट असलेल्या खोपोली नगरपालिकेकडून नागरिकांना मुलभूत सुविधा देण्याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. खोपोली नगरपालिकेच्या बहुतेक शाळांत स्वच्छतागृहांची अतिशय दुरावस्था झाल्याने बंद ती आहेत.दुसरीकडे नगरपालिका शाळांच्या आवारात खेळणी आहेत, पण ती तुटलेली व असुरक्षित स्थितीत आहेत.

खोपोली नगरपालिकेच्या बारापैकी काही शाळांमध्ये स्वच्छतागृहेच नसल्याचे समोर आले आहे. तर ज्या शाळांत स्वच्छतागृहे आहेत, ती डागडुजी व देखभाली अभावी धोकादायक झाल्यामुळे बंद करण्यात आली आहेत. तशा प्रकारची अधिकृत सूचनाच त्या त्या शाळांनी लावलेल्या आहेत. अनेक शाळांच्या पटांगणात मुलांना खेळण्यासाठी बसविण्यात आलेली खेळणी तुटून धोकादायक अवस्थेत उभी आहेत. तर  शाळांच्या पटांगणात सर्वत्र अस्वच्छता व कचरा पडलेला दिसत आहे.

खोपोली नगरपालिकेकडून शिक्षण मंडळाला शाळांची देखभाल व डागडुजीसाठी तीन कोटीहून अधिक रुपयांच्या निधीची तरदूत आहे. दरवर्षी मंजूर निधी तर खर्च होतो, मात्र नगरपालिका शाळांची अवस्था सुधारलेली दिसत नाही. नगरपालिकेकडून विविध कामासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येतात, ते लोकप्रतिनिधी किंवा अधिकार्‍यांच्या मर्जीतील असतात. त्यामुळे कामे निकृष्ठ दर्जाची होतात व निधी खर्च होऊनही दुरावस्था कायम रहात असल्याचे स्पष्ट होत आहे.

शिक्षण मंडळाच्य प्रशासकीय अधिकारी जयश्री धायगुडे यांनी शाळांमध्ये विविध सुधारणा करण्याबरोबरच तुटलेली खेळणी बदलण्याबाबत नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र दोन वर्षे त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविली जात आहे. शाळा इमारती व खेळण्यांच्या दूरवस्थेसंबधी नगरपालिकेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने पालकांसह विद्यार्थी व शिक्षकांत नाराजी आहे.

नगरपालिका शाळांची पहाणी केली जाईल. काही शाळांत गैरसोयी आहेत, हे खरे आहे. त्या बाबत डागडुजी तसेच मुलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव तयार आहे.  नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याला मंजूरी घेवून, तत्काळ कामांना सुरुवात होईल. शाळा पटांगणातील तुटलेली खेळणी व आवश्यक सुविधांबाबतही अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येईल.

-सुमन औसरमल, नगराध्यक्ष, खोपोली

शिक्षण मंडळाकडून कारवाई नाही

खोपोली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगरपालिका शाळेच्या पटांगणात बसवलेली खेळणी मागील दोन वर्षापासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. या शाळेच्या प्रवेशद्वाराचे कुलूप परस्पर उघडण्यात आले असून, शाळेच्या पटांगणात परिसरातील रहिवासी कपडे सुकविणे तसेच घरातील विनावापराचे साहित्य ठेवले आहे. नगरपालिका किंवा शिक्षण मंडळाकडून त्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply