Breaking News

विराटची 27 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

साऊदम्प्टनः वृत्तसंस्था

हिटमॅन रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध नकोसा विक्रम नोंदवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने दमदार खेळी केली. त्याने या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा संयमाने सामना करताना अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. त्याने ऑस्ट्रेलिया ( 82) आणि पाकिस्तान ( 77) यांच्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धही अर्धशतक झळकावले. कोहलीची ही खेळी विक्रमी ठरली. 27 वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने प्रथमच सलग तीन सामन्यांत अर्धशतक करण्याचा पराक्रम केला. यापूर्वी 1992साली मोहम्मद अझरूद्दीनने सलग तीन अर्धशतके झळकावली होती.

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीवीरांना झटपट माघारी पाठवून अफगाणिस्तानने टीम इंडियाला कोंडीत पकडले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करुन संघाला या गुंत्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला सलग तिसर्‍या सामन्यात अर्धशतकाचे शतकात रुपांतर करता आले नाही. विजय शंकरला आज मोठी खेळी करुन आपले स्थान पक्के करण्याची संधी होती, परंतु तोही अपयशी ठरला. महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी विकेट टिकवली, परंतु त्यांच्या धावांच्या गतीचा वेग संथ होता.

केदार जाधवने अर्धशतकी मजल मारली,  त्याने 52 धावा केल्या. त्यामुळे भारताला 224 धावांपर्यंतच मजल मारता आली.

रोहित शर्मा लवकर माघारी परतल्यानंतर विराटने दुसर्‍या विकेटसाठी लोकेश राहुलसह 57 आणि तिसर्‍या विकेटसाठी विजय शंकरसह 58 धावांची भागीदारी केली. दरम्यान त्याने वन डे क्रिकेटमधील 52वे अर्धशतकही पूर्ण केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील हे त्याचे चौथे, तर अफगाणिस्तानविरुद्ध पहिलेच अर्धशतक ठरले.

विराटची ही झुंज मोहम्मद नबीने संपुष्टात आणली. विराटने 63 चेंडूंत 5 चौकारांसह 67 धावा केल्या.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी करणार्‍या रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply