खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील होणाड ग्रामपंचायत हद्दीतील जयसिंग अलाइस कंपनीमध्ये चिमणीपडून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर, तीन कामगार जखमी असून त्यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करून व्यवस्थापन आणि मदत करावी अशी मागणी करत उपस्थित कामगारांनी ठिय्या आंदोलन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, जयसिंग आलायस या कंपनीत स्पेअर पार्ट्स बनवून अन्य कारखान्यात पाठवले जात असते, या ठिकाणी 450 कामगार कार्यरत आहेत. गुरुवारी संजय सहानी, विजय यादव, अनिल सहानी, विनोद गवळी (रा. चिंचवली) कामगार पहिल्या पाळीत सकाळी दहाच्या दरम्यान काम करीत असताना चिमणी खाली कोसळून संजय सहानी (वय 36) यांच्या मानेवर जोरदार मार लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर विजय यादव गंभीर जखमी आहे, त्याची प्रकृती चिंताजनक आहे आणि अनिल सहानी विनोद गौड हे जखमी असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करून व्यवस्थापन आणि मदत करावी अशी मागणी करत उपस्थित कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. या वेळी व्यवस्थापन अधिकारी विशाल तलरेजा, खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शुभम कळसेकर व सहकारी कामगारांना कायदा हातात घेऊ नये. नियमानुसार या कामगारांच्या नातेवाईकांना मदत मिळेल, चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे कामगारांना सांगितले. त्यानुसार कामगारांनी सामंजस्यपणा घेऊन पुन्हा कामावर हजर झाले.
या घटनेबाबत खोपोली पोलीस ठाण्यात 304 ,337, 338 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. व्यवस्थापनाची यापुढे काय भूमिका असणार आहे याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे, मात्र या वेळी कामगारांनी व्यवस्थापनाचा ढिसाळपणामुळे ही घटना घडल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या घटनेने कंपनी आवारात सुरक्षिततेबाबत व्यवस्थापन काळजी घेत नसल्याचे दिसून आले, शासकीय अधिकारी तपासणीच्या नावाखाली कार्यालयात जातात व कारखान्यात तपासणी न करता निघून जातात, असाही कामगार वर्गातून आरोप केला जात आहे.