जयपूर : वृत्तसंस्था
इटलीहून आलेल्या पर्यटकांच्या ग्रुपमधील 16 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात भारतातील एका टुरिस्ट गाइडचा समावेश आहे. हे सर्व पर्यटक 215 भारतीयांच्या संपर्कात आले होते, अशी माहिती राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी बुधवारी (दि. 4) दिली. भारतात आतापर्यंत एकूण 28 लोक कोरोना विषाणूबाधित आढळले आहेत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, तर महाराष्ट्रात एकही कोरोना विषाणूग्रस्त रुग्ण आढळला नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. दरम्यान, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.