ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडला
नवी दिल्लीः वृत्तसंस्था
’यॉर्करमॅन’ अशी ओळख असलेल्या लसिथ मलिंगाने शुक्रवारी इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात इतिहास रचला. वर्ल्डकपमध्ये खेळताना सर्वाधिक जलद 50 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्रा आणि श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन या दिग्गज गोलंदाजाचा विक्रम मोडीत काढला.
शुक्रवारी श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना झाला. मलिंगाने 33 व्या षटकात जोस बटलरला अवघ्या 10 धावांवर बाद करीत सर्वाधिक जलद 50 गडी बाद करण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला. इंग्लंडविरुद्ध आक्रमक गोलंदाजी करणार्या मलिंगाने 10 षटकात 43 धावा देत 4 गडी बाद केले. सर्वात जलद 50 गडी बाद करण्याचा विक्रम याआधी ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा आणि श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन या दोघांच्या नावावर संयुक्तपणे होता. या दोन्ही महान खेळाडूंनी सर्वाधिक जलद 50 गडी बाद केले होते. यासाठी या दोन्ही खेळाडूंना वर्ल्डकपमध्ये 30 सामने खेळावे लागले होते. परंतु, लसिथ मलिंगाने अवघ्या 26 सामन्यात ही किमया साधली आहे.
पाकिस्तानचा वसीम अक्रम तिसर्या स्थानावर आहे. वसीमने 34 सामन्यात 50 गडी बाद केले. इंग्लंडविरुद्ध खेळताना मलिंगाने जेम्स विन्सी (14), जॉन बेयरस्टो (शून्य), जो रुट (57) आणि जोस बटलर (10) धावांवर बाद करीत ’यॉर्करमॅन’ असल्याचे दाखवून दिले. 43 धावा देऊन 4 गडी बाद करणार्या मलिंगाचे वर्ल्डकपमधील हे दुसरे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरले. मलिंगाच्या टिच्चून केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने इंग्लंडचा 20 धावांनी पराभव केला.