उरण : प्रतिनिधी – देवशयनी आषाढी एकादशी शुक्रवारी (दि. 12) असल्याने पंढरपूर येथे मोठी यात्रा असते. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील भेंडखळ या गावी असलेल्या प्रतिपंढरपूर समजलेल्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल-रखुमाई देवाची मूर्ती सुमारे 165 वर्षापूर्वीची असून कौलारू मंदिर होते. सन 2013 रोजी भेंडखळ ग्रामस्थ व कमिटी यांच्या सहकार्याने त्याच जागेवर नवीन मंदिर बांधण्यात आले. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, पालखी सोहळा आदी उत्सवात हजारो भाविकांची-भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उरण, अलिबाग येथून भक्तगण दर्शनासाठी येत असतात. सदर मंदिराचे अध्यक्ष उद्धव घरत असून, सेक्रेटरी विजय भोईर हे आहेत.
याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात काकड आरती, अभिषेक व पूजा, प्रदक्षिणा दिंडी, भजन, कविसंमेलन, हरिपाठ, सुरसंगीत कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती सेक्रेटरी विजय भोईर यांनी दिली. श्री विठोबा देव देवस्थान ट्रस्ट कमिटी, भेंडखळ ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळ भेंडखळ व विशेष सहकार्य लक्ष्मण भास्कर ठाकूर, भेंडखळ विशेष साऊंड सर्व्हिस भेंडखळ यांचे सहकार्य मिळणार आहे. वर्षभरात हरिपाठ, हरिनाम सप्ताह व संपूर्ण गावासाठी, भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन, दर महिन्याच्या एकादशीला भजन व कीर्तन, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, चंपाषष्ठीच्या दिवशी यात्रा आदी कार्यक्रम केले जातात, असे अध्यक्ष उद्धव घरत यांनी सांगितले.