Breaking News

पनवेलमध्ये आलेल्या लोकलमध्ये बॉम्बची अफवा; एक जण ताब्यात

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार

मुंबई येथून रविवारी (दि. 15) सकाळी पनवेलला आलेल्या एका लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची खबर एका तरुणाने दिली. त्यामुळे बॉम्बशोधक पथक, लोहमार्ग पोलीस, अग्निशमन दल, आरपीएफ यांनी गाडीची तपासणी केली, मात्र त्यांना बॉम्बसदृश कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे ही अफवा पसरविणार्‍या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबईहून रविवारी सकाळी 8.44 वाजता पनवेलच्या फलाट क्रमांक एकवर लोकल ट्रेन आली. या ट्रेनमधून जगन्नाथ काशिनाथ शेट्टी (वय 37, रा. कामोठे) हा तरुण खाली उतरला व त्याने स्टेशन मास्तरच्या कक्षात जाऊन या ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यामुळे सारेच धास्तावले. लागलीच बॉम्बशोधक पथक, लोहमार्ग पोलीस, अग्निशमन दल, आरपीएफ, श्वानपथक यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. फलाट क्रमांक एक आणि दोन रिकामे करण्यात आले, तसेच संबंधित गाडीची तपासणी केली गेली, मात्र या गाडीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. या वेळी प्रवासी व यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास टाकला. त्यानंतर ही ट्रेन कारशेडला रवाना करण्यात आली. अफवा पसरविणारा जगन्नाथ शेट्टी याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती स्टेशन मास्तर एस. एम. नायर यांनी दिली. या वेळी या तरुणाच्या आई-वडिलांना बोलावून घेण्यात आले होते. त्याला नोकरी मिळत नसल्याने तो वेडसरपणे वागत असल्याचे पालकांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply