उरण : रामप्रहर वृत्त – रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथील विद्यार्थ्यांची गुरुवारी (दि. 11) आषाढी एकादशीनिमित्त बोकडविरा गावात वारकरी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहात झाली.
आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या महाराष्ट्रचा पवित्र सोहळा मानला जातो. अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमला आहे. या जयघोषात भर म्हणून फुंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही वारकरी दिंडी व वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. सकाळी विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, उपमुख्याध्यापक श्री. खाडे सर, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, सौ. मांडवकर मॅडम या मान्यवरांच्या शुभहस्ते विठुरायाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कु. दीक्षित, प्रीती आणि अमिषा या विद्यार्थिनींनी विठ्ठलाचे अभंग सादर केले. लेझिम पथकाद्वारे विठ्ठल-रखुमाईला अभिवादन करण्यात आले. नंतर विठ्ठलाची आरती होऊन पालखीचे प्रस्थान बोकडविरा गावाच्या दिशेने करण्यात करण्यात आले.
‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ अशा घोषणा देत ही वारकरी दिंडी आणि वृक्षदिंडी बोकडविरा गावात पोहचली. बोकडविरा गावचे जागृत देवस्थान म्हणजे गणेश मंदिर येथे दिंडीचे आगमन झाल्यावर बोकडविरा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ कमिटीने दिंडीचे मनोभावे स्वागत केले. पालखीने श्रीगणेशाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात कु. मृदुला आणि मंदार म्हात्रे या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे अभंग गायले. बोकडविरा गावाच्या सरपंच मानसी पाटील, उपसरपंच शीतल पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसुधारणा कमिटी अध्यक्ष सूर्यकांत पाटील, रा. स. पाटील गुरुजी, कृष्णकांत पाटील गुरुजी, यशवंत ठाकूर, लक्ष्मण पाटील, तसेच बोकडविरा गावचे ग्रामस्थ मंडळ यांनी फुंडे हायस्कूलच्या अधिकारी वर्गाचे स्वागत केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. चेअरमन कृष्णाजी कडू यांनी बोकडविरा ग्रामस्थांना त्यांच्या उत्तम सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. शेवटी ही दिंडी संपूर्ण बोकडविरा गावात फिरून पुन्हा फुंडे हायस्कूल येथे पोहचली व दिंडीची सांगता झाली. या दिंडीत विद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि सर्व सेवकवृंद सहभागी झाले होते. विद्यालयाच्या सर्व अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख दर्शना माळी व सर्व सेवकवृंद यांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते.