पनवेल : रामप्रहर वृत्त – श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल महापालिकेच्या हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन विद्यामंदिर आणि कोळेश्वर विद्यामंदिर शाळेत वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर आणि मुग्धा लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यामंदिर आणि कोळेश्वर विद्यामंदिर शाळेत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच कोळेश्वर विद्यामंदिर शाळेत कैलासवासी एस. आर. जोशी मेमोरियल ट्रस्टच्या वतीने 1 ली आणि 2 रीच्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चाचे पनवेल शहर उपाध्यक्ष अभिषेक पटर्वधन, अंजली इनामदार, हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली म्हात्रे, विजया आंबवले, कोळेश्वर विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन हिलम, ट्रस्टचे महिन तळेकर, शिशिर वेलकनकर, हरिश्चंद्र भोईर, शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष प्रमोद कोळी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी नगरसेविका दर्शना भोईर आणि मुग्धा लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना वह्यावाटप केले.