Breaking News

इंग्लंड नवा विश्वविजेता

रोमहर्षक अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय

लॉर्ड्स : वृत्तसंस्था

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने 50 षटकांत 241 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील 241 धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंड विश्वविजेता ठरला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला आहे; तर न्यूझीलंडला वर्ल्डकप स्पर्धेत सलग दुसर्‍यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान मार्‍यापुढे न्यूझीलंडला केवळ 241 धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक (55 धावा) केले, तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने 47 धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली, पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या, पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. त्याने नाबाद 84 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (15 धावा) सुटला. त्यामुळे मूळ सामन्यातील चौकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.

इंग्लंडच्या या विजयामुळे यजमान संघाने विश्वचषक उंचावण्याची ही हॅट्ट्रिक ठरली. याआधी 2011मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताकडे यजमानपद होते तो विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. 2015 साली विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद संयुक्तपणे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याकडे होते. तो विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकला होता. त्यापाठोपाठ 2019चा विश्वचषक इंग्लंडने उंचावला. या स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडकडे होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply