Monday , February 6 2023

नाइट लाइफवरून विसंवाद

मायानगरी मुंबापुरीत नाइट लाइफ सुरू करण्याची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली. येत्या 26 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार होती, मात्र यावरून सरकारमध्ये सहभागी प्रमुख नेत्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे महाआघाडीतील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबईची ओळख आहे. राज्यासह देश-विदेशातून लोक मुंबईनगरीत येत असतात. मुंबईत यापूर्वी बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले अशा अनेक घटना घडल्या असून, विघातक शक्ती नेहमीच मुंबईला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात असतात. अशा वेळी नाइट लाइफला परवानगी दिल्याने रात्रीच्या वेळी वाईट प्रवृत्तींना खतपाणी मिळू शकते. त्यामुळेच आधीच्या सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली नव्हती. सत्तांतर झाल्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यानुसार मुंबईतील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स 26 जानेवारीपासून रात्रभर चालू ठेवण्याचा मानस आहे. हे सर्व व्यवहार निवासी भागांत सुरू राहणार नसतील तर ठीक, मात्र निवासी भागांमधील हॉटेल्स 24 तास सुरू राहणार असतील, तर ते अव्यहार्य ठरेल. कारण सर्वसामान्य, नोकरदार लोकांना झोप आवश्यक आहे. नाइट लाइफच्या निर्णयाचा आम जनतेला फटका बसेल. गंभीर बाब म्हणजे या निर्णयामुळे पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण येईल. पोलिसांना आधीच कामाचा व्याप असतो. अतिरिक्त जबाबदारीमुळे त्यांना पूर्ण रात्र काम करावे लागेल, तसेच वाहतूक पोलीस आणि प्रशासनावरील ताणही वाढेल. परिणामी संपूर्ण चौकटच विस्कळीत होईल, असे भाजपचे म्हणणे आहे. म्हणूनच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच करता येणार नाही, असे म्हटले आहे. गृहमंत्री देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतचा निर्णय 26 जानेवारीपर्यंत घेता येणार नाही. पोलीस यंत्रणेवर किती ताण पडू शकतो याची पूर्ण माहिती घेऊनच राज्य शासन निर्णय घेईल, तसेच यंत्रणा पुरेशी आहे की नाही हे बघून निर्णय घेतला जाणार आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल आणि मगच काय ते ठरविले जाईल. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर वेगळा सूर आळवला आहे. मुंबईत नाइट लाइफ सुरू झाली म्हणून तशी पुण्यात करता येणार नसून पुणेकरांना समजूनच निर्णय घ्यावा लागेल, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. पुणेकर आणि येथील स्वयंसेवी संस्थांची भूमिका वेगळी असते. त्यामुळे तिकडे काही झाले म्हणून इकडे सुरू करता येणार नाही, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले आहे. नाइट लाइफच्या निर्णयाची अंमलबजावणी किती बरोबर किती चूक, ती यशस्वी होईल का याबाबत निर्णय होणे बाकी आहे, मात्र या तीन पक्षांच्या सरकारमध्ये विसंवाद असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आदित्य यांनी जाहीर केलेल्या निर्णयावर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वेगळे मत व्यक्त केल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. राज्य मंत्रिमंडळात आदित्य नवोदित आहेत. घटनात्मक पद भूषविण्याचा त्यांना अनुभव नाही. त्यामुळे यापुढे तरी त्यांनी पर्यायाने शिवसेनेने एखादा निर्णय आतताईपणे घेऊ नये. किंबहुना त्यांना सहकारी पक्षांची मते लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा लागेल हे यातून अधोरेखित होते. तीन पक्षांच्या सरकारचा हा महिमा आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply