Breaking News

पथविक्रेत्यांना जागा देण्याचे धोरण असताना त्यांच्यावरील कारवाई अयोग्य

माजी उपमहापौर सीताताई पाटील यांचा पालिका प्रशासनावर आक्षेप

पनवेल : वार्ताहर

खांदा वसाहतीमध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवले गेलेले नाही. त्याचबरोबर पथविक्रेत्यांना पर्यायी जागासुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. असे असताना त्यांच्यावर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. यावर माजी उपमहापौर सीताताई पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. अगोदर पुनर्वसन आणि पर्यायी जागा द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. खांदा वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजी, फळे, खाद्यपदार्थ, मासळी, हार -फुले त्याचबरोबर पुजेचे साहित्य आणि इतर संसारोपयोगी वस्तू विक्री करून शेकडो जण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. संबंधित फेरीवाल्यांचे सर्वेक्षण होऊनसुद्धा अनेक वर्ष उलटले आहे. त्यानंतर महापालिकेची स्थापना झाली, परंतु राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार संबंधितांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. सेक्टर 8 येथील भूखंडावर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या भूखंडालगत व्यवसाय करणार्‍यांवर सिडकोने कारवाई केली. पदपथाच्या कडेला बसून हे  विक्रेते व्यवसाय करीत आहेत, परंतु त्यांच्यावर सातत्याने महापालिका प्रशासनाकडून कारवाईची टांगती तलवार उगारली जात आहे. नियमानुसार संबंधितांचे पुनर्वसन व्हावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून सिताताई पाटील यांंनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. सिडकोने इतर वसाहतींमध्ये हॉकर्स प्लाझा आरक्षित जागेवर बांधले आहेत. त्याचबरोबर रोज बाजारासाठी जागासुद्धा देण्यात आलेल्या आहेत, मात्र खांदा वसाहतीला प्राधिकरणाने सापत्न वागणूक दिलेली आहे. त्याचबरोबर पनवेल महापालिकेकडून या पथविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. वास्तविक पाहता पथविक्रेत्यांना अद्यापही पर्यायी जागा महापालिकेकडून देण्यात आली नाही. त्यांचे राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार पुनर्वसन करण्यात आले नाही, असे असताना संबंधितांवर कारवाई करणे हे अन्यायकारक असल्याचे मत सीताताई पाटील यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महासभेमध्ये उपसूचनासुद्धा मांडली होती. त्यानुसार खांदा वसाहतीतील पथविक्रेत्यांना पर्यायी भूखंड देणे क्रमप्राप्त आहे, परंतु तसे न करता फक्त कारवाईचा बडगा उगारणे अत्यंत चुकीचे असल्याचे सीताताई पाटील म्हणाल्या.

सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा

प्रशासक आणि प्रशासन प्रमुख म्हणून पथविक्रेत्यांना न्याय द्यावा. त्याचबरोबर जोपर्यंत पर्यायी जागा दिली जात नाही, तोपर्यंत आहे त्याच ठिकाणी त्यांना व्यवसाय करता यावा या अनुषंगाने प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही विनंती सीताताई पाटील यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply