Breaking News

मृत्यूनंतरही ती पाहणार हे सुंदर जग…

कर्जत : बातमीदार  – तालुक्यातील कशेळे येथील भारती गणेश मते (वय 33) यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या डोळ्यांनी अन्य व्यक्ती हे सुंदर जग पाहू शकणार आहे. ‘माझा अचानक मृत्यू झाला, तर माझे डोळे दान करा,’ असा संदेश देण्याचा प्रयत्न कशेळे येथील मृत महिला भारती गणेश मते यांच्या कुटुंबाने केला आहे.

आपल्या डोळ्यांनी कोणा अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश येईल आणि त्याच्या माध्यमातून मी हे जग अनेक वर्षे पाहू शकेल, असे कधीतरी एकांतात भारती हिने आपले पती गणेश याला सांगितले होते. भारती ही आठ महिन्यांची गरोदर होती, मंगळवारी (दि. 9) तिच्या पोटात कळा येऊ लागल्या. पतीने तिला कशेळे ग्रामीण रुग्णालयात तपासणीकरिता नेले. तेेथे योग्य ती सोय नसल्याने आणि डॉक्टरांची जबाबदारी घेण्याची तयारी नसल्याने त्यांनी तिला पुढे नेण्यास सांगितले. तिला उल्हासनगर येथील सरकारी प्रसूतिगृहात दाखल केले, परंतु तिची प्रकृती खालावल्याने तेथील डॉक्टरांनी तिला ठाण्याला नेण्यास सांगितले. भारतीने दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास एका मुलीला जन्म दिला, मात्र रात्री 11 वाजता भारतीचा मृत्यू झाला. त्यानंतर पती गणेश यांना पत्नीने कधीतरी बोलून दाखविलेली इच्छा आठवली आणि त्यांनी तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांना गणेश याने आपला निर्णय सांगितल्यानंतर साहियारा नेत्रपेढीला भारतीचे डोळे दान करण्यात आले.

आज भारती आमच्यात नाही, पण तिचे डोळे जिवंत आहेत आणि अनेक वर्षे ती हे जग पाहू शकेल, हेच आमचे भाग्य, अशी प्रतिक्रिया भारतीच्या सर्व नातेवाईकांच्या तोंडी आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply