Breaking News

दिघोडे येथे रास्ता रोको

अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

उरण ः वार्ताहर

उरण तालुक्यातील दास्तानफाटा ते दिघोडे हा रस्ता अवजड वाहनांसाठी बंदी असतानाही तो सुरू आहे. त्या विरोधात आज दिघोडे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व रिक्षा संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. दास्तानफाटा ते दिघोडे या रस्त्यावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, मात्र या बंदीची पायमल्ली करीत अवजड वाहतूक सुरू आहे. यामुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत. काहींचा बळी गेला आहे. त्याच्या निषेधार्थ अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यासाठी व बेकायदेशीर पार्किंग बंद करण्यासाठी गुरुवारी (दि. 18) दिघोडे येथे सर्व रिक्षा संघटना आणि नागरिकांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी, तसेच या मार्गावर कार्यरत असणार्‍या रिक्षाचालकांनी सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, सेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चव्हाण, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, उरण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक माणिक नलावडे व न्हावाशेवा वाहतूक विभागाचे पोलीस निरिक्षक भारत कामत उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे, राजू मुंबईकर, सुभाष कडू, तर स्वराज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. निग्रेश पाटील आणि रिक्षा चालक व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. या वेळी पोलिसांकडून अवजड वाहने आजपासून बंद करण्यात येऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे येत्या 15 दिवसांत सदर या परिसरांतील कंटेनर यार्डमध्ये असणारी वाहने बाहेर काढून घेण्यात येतील, असे आश्वासन पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर तूर्त रास्तारोको आंदोलन बंद करण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. निग्रेश पाटील यांनी दिली, परंतु 15 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply