पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेच्यावेळी भारतीय संविधानाची प्रत ठेवून सभेचे कामकाज चालवावे, अशी मागणी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.
अनेक महानगरपालिकेत महासभेचे कामकाज चालू होताना ‘राजदंड’ सभेत ठेवला जातो परंतु राजदंड ठेवण्यास कोणताही कायदेशीर आधार आहे किंवा नाही, याची कल्पना मला महासभेने अथवा राजशिष्टाचार विभाग पनवेल महानगरपालिका यांनी मला दिलेली नाही. तसेच राजदंड हा राजेशाहीचे प्रतिक आहे. अनेक महापालिकेत राजदंड पळवून नेणे, त्याचा अवमान करणे हे आपण ऐकले आहे. असा प्रकार आपल्याकडे होईल किंवा नाही, हे सांगता येणार नाही. मात्र भारतीय संविधानाची शासकीय अधिकृत प्रत महासभा कामकाजावेळी ठेवल्यास ती कोणीही पळवून नेऊ शकत नाही, वा अवमानसुध्दा कोणही करु शकणार नाहीत. पनवेल महानगरपालिकेने ही प्रथा सुरु केल्यास अन्य महापालिकेत देखील ही प्रथा सुरु करुन जुन्या राजेशाहीच्या अन्यायकारक खाणाखुणा पुसून टाकण्याचे ऐतिहासिक काम केल्याचे इतिहासात नोंदविले जाईल, असेही प्रकाश बिनेदार यांनी नमूद केले आहे.