पनवेल ः रामप्रहर वृत्त
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने राष्ट्रीय सफाई कामगार दिनानिमित्ताने भव्य कामगार कर्मचारी मार्गदर्शन मेळावा ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कामगार कर्मचारी मेळाव्याचे उदघाटन युनियनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संतोषभाई घरत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमल, डॉ. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपमहापौर विक्रांत पाटील, उपआयुक्त जमीर लेंगरेकर, सहाय्यक आयुक्त आस्थापन विभाग चंद्रशेखर खामकर, सभागृह नेते
परेश ठाकूर, रिपाई नेते जगदीश गायकवाड, शरद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या मार्गदर्शन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी युनियनचे राष्ट्रीय महासचिव एन. बी. कुरणे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी कामगार मेळाव्यावर आपापले विचार मांडले. कामगार नेते संतोषभाई घरत म्हणाले की, कामगारांना कुठलीही समस्या असली तरी आम्ही सदैव कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहोत. कामगारांचे हक्क आणि अधिकाराची व त्यांना मिळणार्या सर्व सोयी सुविधांची जाणीव करून देण्यासाठी या कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे कामगार नेते संतोषभाई घरत यांनी बोलताना सांगितले. तर आयुक्त म्हणाले की, ग्रामपंचायतमधील सफाई कामगारांना महानगरपालिकेमध्ये सामावून घेण्यात येईल तसेच सफाई कामगारांना मेडीकलची मोफत सुविधा देण्याचे व इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. यावेळी सफाई कामगारांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना सम्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.