Breaking News

‘साहित्यसंपदा’चे दुसरे साहित्य संमेलन उत्साहात

कोल्हापूर : प्रतिनिधी

साहित्यसंपदा समूहातर्फे नुकतेच दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन कोल्हापूर येथे रविवारी (दि. 28 जुलै) झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार ए. के. शेख, तर स्वागताध्यक्ष स्मित शिवदास होते. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या या सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिकांनी सहभाग घेतला होता. या वेळी ग्रंथोत्सवाचे उद्घाटनही करण्यात आले. विविध पुस्तकांची आणि ग्रंथांची ओळख उपस्थित निमंत्रितांना करून देण्यात आली. व्यासपीठ पूजनानंतर संमेलनाचे उदघाटन ए. के. शेख यांच्या हस्ते होऊन, निमंत्रित साहित्यिक अप्पासाहेब जकाते-यादव, सुरेश पाटील, पत्रकार गणेश मानस, दत्ता पाटील आणि स्वामी विवेकानंद संस्थेच्या प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. साहित्यसंपदा समूहातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या मान्यवरांचा या वेळी सत्कार करण्यात आला. नांदेड येथील कवयित्री रोहिणी पांडे यांच्या रोही पंचाक्षरी या काव्यप्रकारचे लोकार्पण करण्यात आले. तीन सत्रात पार पडलेल्या या संमेलनात द्वितीय सत्र काव्यवाचनाचे झाले. या सत्रात निमंत्रितांनी आपल्या कविता व गजल सादर केल्या. तिसरे सत्र चर्चा व कथाकथन असे होते.

या संमेलनासाठी मुंबईहून निघालेले 12 साहित्यिक पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकून पडले. त्यामुळे त्यांना संमेलनाला पोहोचता आले नाही. त्यांच्या आठवणीने उपस्थित सार्‍या साहित्यिकांना त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवली, असे साहित्यसंपदा ग्रुपचे प्रमुख वैभव धनावडे यांनी संमेलनाची माहिती देताना सांगितले. फक्त प्रस्थापितच नव्हे, तर नवोदित साहित्यिकांनाही हक्काचे व्यासपीठ मिळाल्याची भावना संमेलनानंतर अनेक साहित्यिकांकडून प्रगट झाली, तसेच जातीधर्माच्या बंधनापासून मुक्त एकोपा जपत साहित्यनिर्मिती करण्याचा विचार प्रामुख्याने प्रत्येकाच्या मनात  रुजविण्यात यश आले, असे संमेलन प्रवक्ते वैभव चौगुले यांनी पत्रकारांना सांगितले. या संमेलनाच्या नियोजनासाठी रमेश धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सारंग चव्हाण, स्वप्नाली ढोणुक्षे, अश्विनी मेंगाणे, उत्तम चोरडे यांनी मेहनत घेतली. संमेलन नियोजनाची जवाबदारी मनोमय मीडिया यांनी उत्तमपणे सांभाळली.

Check Also

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे मागणी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त पेण …

Leave a Reply