म्हसळा : प्रतिनिधी
लोकशाहीतील महत्वाचा घटक असलेल्या निवडणूक प्रक्रियेची जाणीव व्हावी, यासाठी म्हसळा शहरातील शाळा नं. 1 मधील विद्यार्थ्यानी निवडणुकीचे धडे घेतले. म्हसळा शाळा नं.1 मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याध्यापिका शुभदा दातार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्वराज्य सभा निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. या निवडणूक प्रक्रियेत दूसरी ते चौथीच्या 115 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यात चैतन्य पाष्टे 31 मताने विजयी झाला व त्याची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली, तसेच सोनल बुरपल्ले, श्रावणी नांदगावकर, निरज शिंदे, निरजा धोत्रे, वैदही निगुडकर, तनुष्का कदम, आर्य करडे, श्रावणी तांदळेकर, श्रध्दा सांगळे यांची विविध खात्यांच्या मंत्रीपदी निवड करण्यात आली.
शिक्षक राजेंद्र मालुसुरे, सुनेत्रा खेडेकर, कल्पना पाटील व वंदना खोत यांनी या निवडणूक प्रक्रियेत मतदार यादी प्रसिध्द करणे, मतपत्रिका छापणे, निवडणूक यंत्रणेचे कर्मचारी निवडणे, मतदाराच्या बोटाला शाई लावणे, मतपत्रिका घडी करून टाकणे आदी कामे केली. ही सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यानी अनुभवली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा किशोरी बनकर, मेघना कदम, सुनील अंजर्लेकर, सतीश शिगवण यांच्यासह पालक उपस्थित होते.