मुरूड जंजिरा : प्रतिनिधी
बिल जास्त येऊ नये म्हणून वीजग्राहक विविध क्लुप्त्या वापरून वीज मीटरमध्ये हेराफेरी करीत असतात. हे कुठेतरी थांबायला पाहिजे याकरिता वीज वितरणच्या वतीने भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुरूड तालुक्यात कल्याण व पेणच्या भरारी पथकांनी धडक मोहीम हाती घेऊन मुरुड शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी वीजचोरी केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. भरारी पथक फिरत असताना काही ठिकाणी घरगुती वीज मीटरमध्ये फेरफार करत वीज चोरी केल्याचे वीज महावितरणच्या कल्याणच्या भरारी पथकास निदर्शनास आल्याने याप्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली तर घरगुती वीज मीटर वरुन व्यावसायिककरिता वापरत असल्याच्या पेणच्या भरारी पथकांना आढळून आल्याने या तीन जणांवर कारवाई करण्यात आली. वीजचोरी प्रकरणी पाच जणांवर भारतीय विद्युत कायदा 2005 अंतर्गत कलम 135 व 126 कलमानुसार कारवाई करण्यात येणार आहे असे मुरूड महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता महादेव दातीर यांनी सांगितले. मुरूड महावितरणचे उप मुख्य कार्यकारी अभियंता महादेव दातीर यांच्याकडून लोकांना आवाहन करण्यात आले आहे की, कृपया वीज चोरी करू नका. मीटरमध्ये हेराफेरी करू नये. महावितरणकडून आलेले बिल प्रामाणिकपणे स्विकारून त्याचा भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात भरारी पथकांनी मुरूड तालुक्यात वीजचोरी पकडून महावितरणने मोठा दंड वसूल केला असून ही कार्यवाही अशीच सुरु राहणार असल्याचे दातीर यांनी या वेळी सांगितले आहे.