मुरूड : प्रतिनिधी
काशीद किनार्यावर दर शनिवार-रविवार हजारो पर्यटक येत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी गर्दी नेहमीच पाहावयास मिळते. या शनिवारी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीची सुट्टी त्यामुळे शनिवार-रविवार सुटी असल्याने या ठिकाणी हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी गर्दी दिसत होती.
मुरूड तालुक्यातील काशीद समुद्र किनारा हा सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. मुरूड हे मुंबईपासून 160 किलोमीटर अंतरावर असणारे एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. निळाशार समुद्र व सफेद वाळू व समुद्राच्या सभोताली सुरूचा झाडांची गर्दी यामुळे पर्यटकांनी येथे नेहमीच गर्दी केल्यामुळे हे ठिकाण लोकप्रिय झाले आहे.
काशीद येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतच असतात, परंतु संचारबंदी हटल्यावरही काही दिवस पर्यटकांनी काशीदकडे पाठ फिरवली होती. आताची ही संख्या पुरेशा प्रमाणात असली, तरी आगामी काळात यापेक्षा दुप्पट गतीने पर्यटक काशीद समुद्र किनारी येतील, असा विश्वास येथील स्थानिक लोकांनी व्यक्त केला आहे.
अजूनपर्यंत पर्यटकांची संख्या पाहिजे त्या प्रमाणात वाढलेली नाही. अजूनसुद्धा कोविडचा परिणाम दिसत आहे, परंतु आगामी काळात पर्यटकांची संख्या दुप्पट होणार आहे हे नक्की.
-संतोष राणे, ग्रामपंचायत सदस्य, काशीद