Breaking News

तंत्रज्ञानासोबतची जोखीम

तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसलेली मंडळी कित्येकदा अशा अ‍ॅप्सवरील खाजगीपणाच्या सेटिंग्जबद्दल अनभिज्ञ असतात. अज्ञानापोटी अशी खाजगी छायाचित्रे चुकीच्या व्यक्तींच्या हाती लागल्यास त्यांचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. कधी कधी तर ध्यानीमनी नसताना तंत्रज्ञानाच्या साह्याने कुणीतरी तुमच्या खाजगीपणावर आकस्मिक घाला घालू शकतो असेही आता अनेक प्रकरणांतून अघडकीस येऊ लागले आहे.

तंत्रज्ञानामुळे आपले खाजगीपण दिवसेंदिवस अधिकाधिक धोक्यात येत चालल्याची चर्चा अधूनमधून होतच असते. तांत्रिकदृष्ट्या शिक्षित व सजग अशा वर्गात त्यासंदर्भातील माहितीमुळे पुरेशी काळजी घेतली जाते. परंतु सर्वसामान्य मात्र त्याविषयी बर्‍यापैकी अंधारात असतात. एकमेकांचे पाहून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने चालणार्‍या स्मार्ट फोनपासून स्मार्ट टीव्हीपर्यंतच्या अनेक अपकरणांचा वापर ते करतात. सुरक्षा आणि खाजगीपणाविषयीच्या अटीशर्तींची लांबलचक माहितीपत्रिका बहुतेक अपकरणे, वेबसाइट्स, अ‍ॅप्स यांच्यावर आपल्या नावाची नोंदणी करतानाच ओके करावी लागते. वेळेअभावी व त्यातील लांबलचक क्लिष्ट तांत्रिक भाषेमुळे फारसे कुणीच या अटीशर्ती वाचत नाही. किंबहुना, वाचू नयेत म्हणूनच त्या तशा छोट्या टाइपात व प्रदीर्घ अशा मजकुरानिशी मांडलेल्या असाव्यात. अगदी सर्वसामान्यांचीही आता साध्या लँडलाइन फोनपासून स्मार्ट फोनपर्यंत मजल गेली आहे. स्मार्ट फोनमुळेच आपले खाजगी फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर करण्यातही सारेच रमताना दिसतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळेच इतर अनेक व्यवहारांप्रमाणे विवाहसंशोधनही केव्हाचेच ऑनलाइन रूप धारण करून बसले आहे. एकमेकांना किंचितही न ओळखणारे तरुण-तरुणी आधी ऑनलाइन एकमेकांशी गप्पाटप्पा करतात आणि मग सूर काहिसे जुळू लागल्यावर प्रत्यक्षात भेटण्याचा पर्याय चोखाळतात. अशातर्‍हेने विवाहेच्छुकांना आमनेसामने आणणार्‍या अनेक वेबसाइट्स आज लोकप्रिय आहेत. शादी डॉट कॉम ही यातली आद्य वेबसाइट. या वेबसाइटसारख्या नामांकित संकेतस्थळाला नुकताच कुणाच्या तरी खोडसाळपणाचा सामना करावा लागला असून यावर विवाहेच्छुकांनी विश्वासाने शेअर केलेली छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये फेरफार करून अर्थात त्यांचे मॉर्फिंग करून ती युट्यूबवर अपलोड करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण अघडकीस आले आहे. यापैकी अनेक तरुणींचे फोटो मॉर्फिंगच्या साह्याने बीभत्स करण्यात आल्याचे आढळले. अत्यंत खाजगी असा हा डेटा चोरीला कसा गेला याचा शोध आता सायबर पोलिस घेतील. शादी डॉट कॉमचे सदस्यत्व मिळवून कुणीतरी हा खोडसाळपणा केला असावा असा अंदाज आहे. हे असेच समाजमाध्यमांवरील छायाचित्रांच्या संदर्भातही होऊ शकते. अनेकदा कित्येकांची इच्छा वा अनुमती नसताना देखील त्यांच्या स्मार्ट फोनवरील छायाचित्रे गुगल फोटोसारख्या अ‍ॅपवर पोहोचलेली दिसतात. दुकानांमधील ट्रायल रूम्समधून चोरून छायाचित्रे टिपली जातात वा समाजमाध्यमांवरून छायाचित्रे परवानगीविना अचलून त्यांच्यात अश्लील फेरफार केले जातात. गुजरातमधील एका दाम्पत्याला तर अलीकडेच अतिशय धक्कादायक अनुभव आल्याचे अघडकीस आले आहे. त्यांच्या बेडरूममधील स्मार्ट टीव्हीच्या कॅमेराच्या साह्याने कुणीतरी त्यांचे खाजगी क्षण टिपले आणि ते परस्पर पॉर्न साइटवर शेअरही करून टाकले. आपल्या घरातील खाजगी क्षण असे चव्हाट्यावर पोहोचलेच कसे या विचाराने संबंधित व्यक्ती अचंबित झाली. अखेर सायबर तज्ज्ञांनी स्मार्ट टीव्हीवरील पॉर्न साइटवरून हॅकर्सनी हे कृत्य केल्याचा छडा लावला.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply