![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/08/vanashri-purskar-1-1024x607.jpg)
पनवेल :बातमीदार
शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील आदर्श शैक्षणिक समूहाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. पेड धरती की शान है, जीवन की मुस्कान है हे ब्रीद ध्यानात घेऊन आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते व संचालिका संगीता विसपुते हे नेहमीच निसर्ग संवर्धनाकरिता कटिबद्ध असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत आदर्श समूहाच्या ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाला शासनाचा तिसरा पुरस्कार मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे.
या आधी देखील ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. आदर्श समूहात वेगवेगळ्या प्रसंगी वृक्षारोपण केले जाते, वृक्षारोपणाकरिता जाणीव जागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात, इतकेच काय पण अतिथींचा सत्कारदेखील रोप देऊनच केला जातो आणि निसर्ग संवर्धनासाठी लोकांना सतत प्रेरित केले जाते. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरण संवर्धन इ. क्षेत्रातील त्यांची आस्था व उल्लेखनीय कामगिरीची दखल शासनाने घेऊन 15 ऑगस्ट रोजी, आदर्श समूहाच्या ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाला शैक्षणिक संस्था कोकण महसूल विभाग स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व 50 हजार रुपये रकमेचा धनाकर्ष असे या पुरस्काराचे स्वरूप असून, सदर पुरस्कार नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ही आदर्श समूहाकरिता अत्यंत अभिमानाची गोष्ट असून सर्वांनी निसर्गाप्रती ही बांधिलकी जोपासून अधिकाधिक वृक्षलागवड करावी व शाश्वत विकासाकरिता कटिबद्ध राहावे, असे आवाहन आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांनी पुरस्कार स्वीकारताना केले आहे.