मेलबर्न : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताला हरवून टी-20 विश्वचषकावर पुन्हा एकदा नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांची शतकी भागीदारी आणि गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषक उंचावला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: ठोकून काढले. ऑस्ट्रेलियाने भारताला 20 षटकांत 185 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर भारताला अवघ्या 99 धावांपर्यंतच मजल मारता आली.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय हिलीने आपल्या आक्रमक फलंदाजीने योग्य असल्याचे दाखवून दिले. हिलीने या वेळी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वांत जलद अर्धशतक झळकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही. हिलीने 39 चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 75 धावा केल्या. हिली बाद झाल्यावर बेथ मुनीनेही आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला भारतासमोर धावांचा डोंगर उभारता आला. मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसर्याच चेंडूवर ती दोन धावा काढून बाद झाली. त्यानंतर दुखापतग्रस्त तानिया भाटियाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. आधीच्या षटकात दोन चौकार लगावलेली स्मृती मानधना 11 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर 4 धावांवर माघारी परतली. दीप्ती शर्माने झुंज देत सर्वाधिक 33 धावा केल्या, पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल 6 फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक 4 बळी टिपले.