मुंबई : प्रतिनिधी
किंग्स इलेव्हनचा कर्णधार रविचंद्रन अश्विननं जोस बटलरला ‘मंकडिंग’ नियमानुसार बाद केल्यानंतर क्रिकेटवर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसा हा नियम नवा नाही. त्यावरून याआधीही चर्चा झडल्यात, पण अश्विन-बटलर प्रकरणामुळे आयपीएलमध्ये फलंदाजांना घाबरवण्यासाठी गोलंदाजांना एक नवं शस्त्र मिळालं आहे, परंतु क्रिकेटचं शास्त्र कोळून प्यायलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीपुढे हे शस्त्र निष्प्रभ ठरल्याचं बुधवारच्या मुंबई-चेन्नई सामन्यात पाहायला मिळालं. धोनीला ‘मंकडिंग’ करायला गेलेल्या कृणाल पांड्याचा ‘पोपट’ झाला आणि चेन्नईच्या चाहत्यांनी एकच कल्ला केला.
मुंबईच्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, केदार आणि धोनी यांनी चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 14व्या ओव्हरमध्ये केदार स्ट्राईकवर होता, तेव्हा कृणाल आपली दुसरी ओव्हर टाकायला आला. चोरट्या धावा घेण्यात जाधव आणि धोनी माहीर आहेत. अशा धावा घेताना, गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटायच्या आतच नॉन-स्टाईकर क्रीझ सोडतो. हेच गणित बांधून कृणाल पांड्या बॉल टाकता-टाकता थांबला. पंजाबविरुद्धच्या सामन्यात मयांक अग्रवाल नॉन-स्ट्राईकला असताना त्यानं अशीच खेळी केली होती. त्या वेळी मयांक क्रीझच्या बाहेर होता. त्याला पंचांनी समज दिली होती. तसाच कृणालचा ‘प्लॅन’ होता, पण तो धोनीनं ‘फ्लॉप’ ठरवला. बहुधा कृणालची रणनीती धोनीनं आधीच ओळखली होती. त्यामुळे त्यानं क्रीझ सोडलंच नाही आणि कृणालला हात हलवत पुन्हा बॉलिंग टाकायला जावं लागलं. त्या वेळी मुंबईचा यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकच्या चेहर्यावरचं हसू खूप बोलकं होतं.