Breaking News

सोसल तेवढी सोशल मीडिया

सध्या राजकीय पक्षांतील आवक जावक, पक्षांतर याची चर्चा तसेच रकाने वृतपत्रांमध्ये भरून येत असून निवडणुका आल्या की हे चित्र सर्रास पाहावयास मिळत असते. फरक एवढाच आहे की 10-15 वर्षांपूर्वी जे आवक झाल्याने आनंद साजरा करण्यासाठी फटाकेबाजी करीत होते. त्यांच्या समोर आता काजवे चमकू लागले आहेत. ती कार्यालये ओसाड वाटू लागली आहेत. याची चर्चा सोशल मीडियावर असतानाच मुंबई मेट्रो रेल एम.एम.आर.सी.च्या मानेजिंग डायरेक्टर अश्विनी भिडे यांनी मुंबईच्या आरे कॉलनीतील झाडांचा मुद्दा गरम झाला आणि सोशल मीडियाचा मुद्दा आला असता, डायरेक्टरबाई मुद्दा सोडून सोशल मीडियावरच बरसल्या.

सामाजिक मीडियावर काय येते काय नाही याकडे लक्ष देऊन काम केले, तर हाती घेतलेले काम पूर्ण होणार नाही, पूर्णत्वास जाणार नाही, असे मत भिडेबाईंचे झाले. हल्ली अनेक शासकीय अधिकार्‍यांनी मनोमन हा समज करून घेतला असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अगदी तहसीलदार ते जिल्हाधिकारी, पदापर्यंतचा अधिकारी वर्ग याकडे वाकड्या नजरेने पाहत असतात, मात्र या भिडे बाई थोड्या जनमताच्या विचाराला कानाडोळा करण्यास सांगत असतील किंवा सोशल मीडियाला एवढे महत्त्व देवू नका, असा स्वतः समज करून घेत असतील, तर पब्लिक क्राय काय असते याची जाणीव या मुंबई मेट्रोच्या डायरेक्टरबाईंना नसावी. पब्लिक क्रायने कधी काळी मोठमोठ्या घटना घडत असताना सरकराला मात्र शांतता बाळगावी लागली असल्याची अनेक उद्हारणे मुंबई सह  देशात पाहावयास मिळाली आहेत आणि हा पब्लिक क्राय समाज माध्यम पेटून उठल्यानंतर घडलेला आहे.

समाज माध्यमांचा दणका ज्या अधिकार्‍याला वा संस्थांना मिळाला आहे त्यांनी अशा उठाठेवीच्या बाता पुन्हा भविष्यात केल्या असल्याच्या नोंदी नाहीत. एवढा प्रभाव समाज माध्यमांनी प्रस्थापित केला आहे. भविष्यात आरे येथील मेट्रोच्या कामाबाबत अश्विनी  भिडे या महिला अधिकार्‍याला याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. याची दाट शक्यात निर्माणही झाली आहे. पलीकडे सोशल मीडियाने एका अंधारमय दडलेल्या कलाकाराचा आवाज रातोरात यशाच्या शिखरावर नेवून ठेवला आहे. एक वेळ खाण्याची चिंता असणार्‍या या कलाकाराला नव्हत्याचे होते काय असते याची जाणीव करून दिली. रुपया-दहा रुपयाला महाग असणार्‍या राणू मंडल या महिलेला संपत्तीबरोबरोच प्रसिद्धीच्या झोतात नेवून ठेवले. कित्येक जण ग्लॅमर, फिल्म इंडस्ट्रीजसाठी पूर्ण आयुष्य आपले सर्वस्व खर्ची घालतात. गायकीसाठी स्वतःला झिजवून घेतात पैकी मोजकेच या झगमगत्या दुनियेत पाय रोवून बसल्याची काही मोजकीच उदाहरणे आहेत.

बंगालमधील रानाधार रेल्वेस्थानकाच्या फलाटावर गानकोकिळा लता मंगेशकर यांची अवघड गीते अगदी सहज गाणार्‍या एका अनाथ महिलेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर झळकताच त्याची क्रेझ संपूर्ण देशात झाली आणि सारेगमपासारख्या तानसेन, भीमसेनांच्या दरबारात रेल्वे फलाटावरील आवाज दुमदुमला आणि त्या आवाजाने तेरी मेरी कहाणी ते हैप्पी हार्डी अंड हिरपर्यंत मजल मारली. हा प्रभाव फक्त समाज माध्यमच निर्माण करू शकतात. या आवाजाची दखल देशाने घेतली. समाज माध्यम फक्त समाजात घडत असलेल्या गोष्टींचाच किंवा भोवतालच्या घटनांचाच वेध घेत असते, मागोवा घेत असते असे नाही तर सामाजिक बांधिलकीही जपत असते. विचारांची पाखरणही करीत असते. सुसंस्कारित विचारांची आदानप्रदानही होत असते. एक वास्तव दर्शविणार्‍या ओळी आहेत. माणसाने खरंच कसे जगायचे या शब्दांतून दर्शन होते. पैसा बर्‍यापैकी खर्च केला, तर माजुरडा म्हणतात, पैसे असून साधं राहील तर भिकारडा म्हणतात. भरपूर दानधर्म केला तर दोन नंबरचे पैसे असणार असे म्हणतात, तर दानधर्म नाही केला तर कंजूष मारवाडी म्हणतात.

सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही कामधंदा नाही आणि नाही गेलं तर माणुसकी नाही म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात  सगळ्यांशी मनमोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात, अशा या शब्दांचा मारा झेलत शेवटी आपणच ठरवायचे जीवन कसे जगायचं हसत हसत की रडत रडत.

आय.पी.एस. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी समाज माध्यमांवर एक कविता टाकली. ती कविता सोशल मीडियावर खूपच गाजली. जगण्याचं सूत्र चुकतंय का, असा सवालही विचारला. कुणी कोणाकडे जाईना कुणी कोणा कडे येईना, जगलात काय मेलात काय माया कुणाला येईना संवेदनशीलता आता फारशी कुठं दिसत नाही, बैठकीत किंवा ओसरीवर गप्पांची मैफल बसत नाही, फाटकं गाव नको वाटत जवळचं नातं असलं, तरी सांगायला नको वाटतं. उच्चशिक्षित असूनही माणूस आजारव वाटतं. इंटेरीयर केलेय घरामध्ये लुगड धोतर जुनं वाटतं, सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे कसे काय िेीह असतील, पार्लर मधून आणल्या सारखे चिकाने चोपडे कसे दिसतील, उन्हा तान्हात तळणारी मानसं काळी पडणारच गरिबीन गांजल्यावर चेहर्‍यावरच रंग उडणारच, कुरूप ते नाहीत कुरूप तू झालास, प्रेम नात्यावर करायचं सोडून दिसण्याला भुलून गेलास, काळी असो गोरी असो माय ही माय असते, बाप स्वतःला गाडून घेतो म्हणून तुझी मजा असते. पात्र कितीही मोठं झालं तरी गंगेचं मूळ विसरू नये, सुख असो की दुःख असो, आपल्या माणसाला विसरू नये, दिसण्यावर प्रेम करू नकोस आपलं समजून जवळ घे एरव्ही नाही आलास तरी दिवाळीला तरी घरी ये, दुसर्‍याचा छळ करून तुम्ही सुखी होणार नाही पॅकेज कितीही मोठं असू द्या जगण्यात मजा येणार नाही.

जग जवळ करताना आपली माणसं तोडू नका. अमृताच्या घड्याला अविचाराने लाथाडू नका, मी का बोलू मी का कमीपणा घेवू मी का नमते घेवू मीच का नेहमी समजून घ्यायचं मी काय कमी आहे का असे बरेच सारे मी आहेत. जे आयुष्यात विष कालवतात म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा अशी समाज माध्यमांवरील शब्द नाती गोती जडणारे असतात आणि शेवटी याच सोशल मीडियावर काही शब्द जीवनाला जगायला शिकवतात.

कितीक सरले कितीक उरले, आयुष्याला मोजू नका. मस्त जगू या आनंदाने, मंत्र मुळी हा सोडू नका. नाही पटले काही जरीही उगाच क्रोधीत होऊ नका. व्यक्ती तितक्या विचारधारा, मंत्र मुळी हा सोडू नका. योग्य अयोग्य, चूक बरोबर मोजमाप हे लावू नका. विवेकबुद्धी प्रत्येकाला, मंत्र मुळी हा सोडू नका. सुख-दुःख हे पुण्य पाप ते, दैव भोग हे तोलू नका. कर्म फळाच्या सिद्धांताचा, मंत्र मुळी हा सोडू नका. खाण्याबाबत हट्टी आग्रही, कधी कुठेही राहू नका. खाऊ मोजके राहू निरोगी, मंत्र मुळी हा सोडू नका. संस्कारांचे मोती उधळले, पैसा शिल्लक ठेवू नका. पैसा करतो आपले परके, मंत्र मुळी हा सोडू नका. मत आपले, विचार, सल्ला, विचारल्यावीण देऊ नका. मान आपला आपण राखा, मंत्र मुळी हा सोडू नका. नित्यच पाळा वेळा, सगळ्या वेळी अवेळी जागू नका. पैशाहूनही अमूल्य वेळा, मंत्र मुळी हा सोडू नका. नाही बोलले कुणी तरीही, वाईट वाटून घेऊ नका. मौन साधते सर्वार्थाला, मंत्र मुळी हा सोडू नका. जगलो केवळ इतरांसाठी, कुठेच आता गुंतू नका. फक्त जगू या आपल्यासाठी, मंत्र मुळी हा सोडू नका. जाणा कारण या जन्माचे, वेळ व्यर्थ हा घालू नका. श्वासोश्वासी नामच घ्यावे, मंत्र मुळी हा सोडू नका. शेवटी समाज माध्यमांचा वापर आपण कसा करायचा चांगले घ्यायचे की वाईट सोडून द्यायचे हे आपले आपण ठरवायचे असते.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply