खारघर : रामप्रहर वृत्त
सौर दिवे कार्यशाळेचे बुधवारी (दि. 2 ऑक्टोबर) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2019 रोजी विद्यार्थी सौरदूत योजनेंतर्गत 100 पेक्षा जास्त देशांमध्ये एकाच वेळी सौर दिवे बनविण्याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. विविध महाविद्यालय व शाळांमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. ही कार्यशाळा पूर्ण करणार्या विद्यार्थी, तसेच शिक्षकांना मुंबई आयआयटीकडून प्रमाणपत्र मिळणार आहे. सौरदूत योजना भारताचे सौरपुरुष आयआयटीचे प्रा. चेतनसिंह सोळंकी यांनी प्रथमच राबवली आहे. या कार्यशाळेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे 300 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यासाठी मास्टर ट्रेनर म्हणून भौतिकशास्त्राच्या शिक्षिका अंजली माने, तसेच विद्यार्थी ट्रेनर आयुष्य ठाकूर, क्रिश गुप्ता, विवेक गोयल, सुयश दुबे यांची निवड करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेला संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांचे सहकार्य लाभणार आहे.