Breaking News

‘चांगल्या लोकांनाच पक्षात प्रवेश’

नागपूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केलेल्या जोरदार टीकेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ’दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भारतीय जनता पक्षाला गरज नसून, शरद पवार यांच्या पक्षात लोक का राहायला तयार नाहीत, यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आत्मचिंतन करावे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे.

ज्या नेत्यांची ईडी चौकशी करीत आहे, अशा लोकांना भारतीय जनता पक्षात कधीही घेतले जाणार नाही. जे चांगले आहेत, लोकांची कामे करतात अशांनाच पक्षात घेतले जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

भारतीय जनता पक्षाकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार येण्यास उत्सुक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मात्र ज्याची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे अशांना आम्ही घेणार नाही. कुणाला दबाव टाकून पक्षात घेण्याइतका आमच्याकडे वेळ नाही. भारतीय जनता पक्ष कुणाच्या मागे धावेल अशी पक्षाची स्थिती नाही, असेही फडणवीस म्हणाले. भारतीय जनता पक्षाने कधीबी दबावाचे राजकारण केले नाही. आमच्याकडे मोदी यांच्यासारखा मोठा नेता आहे, असे सांगत लोक का बाहेर जातात, याबाबत पवारांनी आत्मचिंतन करायला हवे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

आमच्या सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अडचणीच्या काळात मदत केली आहे. अनेक साखर कारखानदारांना मदत केली आहे. त्यावेळी आम्ही त्यांना त्या बदल्यात पक्षात या असे कधीही म्हटले नाही. दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची गरज नाही.

-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Check Also

आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांची पनवेलमध्ये कातकरी समाजाच्या प्रश्नावर क्षेत्रभेट आणि बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील प्लॉट क्रमांक ५३८ ए येथील कातकरी समाजाच्या मालकी हक्काच्या …

Leave a Reply