उरण : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा लढा ठरलेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या नाग्या महादू कातकरी या आदिवासी समाजातील हुतात्म्याचा स्वतंत्र पुतळा चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ठिकाणी आक्कादेवीच्या माळरानावर साकारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ समाजसेविका ठमाताई पवार यांच्या हस्ते बुधवारी (दि. 25) करण्यात आले.
या वेळी शेकडो आदिवासी बांधवांनी आदिवासी समाजातील शूरवीर नाग्या महादू कातकरी यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले. या वेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यात विखुरलेल्या आदिवासी महिलांनी या आक्कादेवीच्या माळरानावर आदिवासी समाजातील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमासाठी जेएनपीटीचे माजी विश्वस्त महेश बालदी, वनवासी कल्याण आश्रमाचे वसंत भाऊ पाटील, महाराष्ट्र प्रांत हितरक्षक प्रमुख सुदाम पवार, उरण तालुका वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष मनोज ठाकूर, चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष चिर्लेकर, सदस्य रमेश फोफेरकर, सचिव विश्वास मोकल यांच्यासह शेकडो आदिवासी महिला व बांधव उपस्थित होते.