दहशतवादी हल्ल्याचा भाजपने केला निषेध
अलिबाग : प्रतिनिधी
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा शुक्रवारी (दि. 15) भाजपतर्फे निषेध करण्यात आला. या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहून पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता हल्ल्याच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली. या वेळी भाजप नेते महेश मोहिते, हेमंत दांडेकर, सतीश लेले, सुनील दामले, राजेश पाटील, उदय काठे, अंकीत बंगेरा, राजेश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महावीर चौक, आंबेडकर पुतळा मार्गे निषेध रॅली बसस्थानकात दाखल झाली. या वेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हल्ल्याचे सडेतोड उत्तर द्या, अशी मागणी करतानाच पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा मुरूडमध्ये निषेध; नागरिकांनी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
मुरूड : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर केलेल्या हल्ल्याचा मुरूड शहरातील हिंदू, मुस्लीम व अन्य धर्मियांनी शुक्रवारी (15 फेब्रुवारी) शहरातील पुरकार नाक्यावर पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. या वेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला. त्यानंतर या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नगराध्यक्षा स्नेहा पाटील, विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर, कुणाल सतविडकर, विश्वास चव्हाण, आशिल ठाकूर, राशीद फहीम, वंदना खोत, स्नेहा पाके, प्रशांत कासेकर, स्वप्नील कवळे, सिंधु बाथम, डॉ. मकबूल कोकाटे, शुभांगी करडे, सबुक शेख, मुसदीक कदीरी, गौतम जैन, क्रिती शहा, जावेद गोंडेकर, इकबाल सौदागर, सागर चौलकर, विपुल मेहता, संकेत सतविडकर, मोहिद्दीन शेख, शांती जैन यांच्यासह सुमारे 250 नागरिक या वेळी पाकिस्तानचा निषेध व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याकरिता उपस्थित होते.
पुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असली, तरी यात पाकिस्तानची मुख्य भूमिका आहे. म्हणून पाकिस्तानाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आम्ही निषेध व्यक्त केला, असे कुणाल सतविडकर व आशिल ठाकूर यांनी या वेळी स्पष्ट केले. नगराध्यक्ष स्नेहा पाटील व मंगेश दांडेकर यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून पाकिस्तानचा धिक्कार केला. विश्वास चव्हाण, डॉ. मकबुल कोकाटे यांनीही या हल्ल्याचा जाहीर निषेध केला.
विद्यार्थ्यांची शहीद जवानांना श्रद्धांजली
मुरूड : जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला केला. त्यात 45 भारतीय जवान मृत्युमुखी पडले. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले असून, शुक्रवारी यशवंतगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी मुख्याध्यापक चिंतामणी जोशी, पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
मुस्लीम समाजातर्फे श्रद्धांजली
अलिबाग : जम्मू-कश्मीर येथील पुलवामामध्ये गुरुवारी सीआरपीएफच्या तुकडीवर आतंकी हल्ला झाला. त्यात 45 जवान शहीद झाले. वीरगती प्राप्त झालेल्या या जवानांना अलिबागमधील मुस्लीम समाजातर्फे शुक्रवारी (15 फेब्रुवारी) शहरातील महावीर चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली.
हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र राहिले पाहिजे. देशाची एकता कायम राखली पाहिजे. आपल्या देशात विविध जातीचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. त्यात फूट पाडण्याचे काम काही जण करीत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आणि देशाचे संरक्षण करणार्या जवानांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. त्यांच्यामुळेच आपण देशामध्ये सुरक्षित जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण आजही श्रद्धांजली वाहत आहोत, असे शरीफ सय्यद यांनी या वेळी सांगितले. फारख सय्यद यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी अलिबागमधील जामा मशीद अध्यक्ष नसीम बुकबाईंडर, मुझफ्फर चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
दहशतवादी हल्ल्याचा पेणमध्ये निषेध
पेण : प्रतिनिधी पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर केलेल्या हल्ल्यात 45 जवान शहीद झाले. शुक्रवारी सकाळी येथील महात्मा गांधी मंदिर सभागृहात शहरातील नागरिकांनी या शहीद जवानांना श्रद्धांजली अपर्ण केली व पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-महम्मद या अतिरेकी संघटनेचा निषेध केला. तहसीलदार अजय पाटणे, अण्णा वणगे यांच्यासह पेणमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्याची मागणी करणारे निवेदन या वेळी तहसीलदारांकडे देण्यात आले.