भिवंडी : प्रतिनिधी
वाडा महामार्गावरील खड्ड्यामुळे एका डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडी तील दुगाडफाटा येथे घडली आहे. नेहा आलमगीर शेख (23 वर्षे) असे या तरुणीचे नाव आहे. नेहा वाडा तालुक्यातील कुडुस येथे राहणारी होती. पुढील महिन्यात 7 नोव्हेंबरला लग्न होणार होते. नेहा लग्नाच्या खरेदीसाठी भावासोबत ठाण्याला गेली होती. खरेदीवरून परत येत असताना दुगाड फाटा येथे बाईक खड्ड्यात आदळल्याने गाडीवर मागे बसलेली नेहा रस्त्यावर खाली पडली आणि मागून येणार्या भरधाव ट्रकने चिरडले. नेहा पेशाने डॉक्टर होती. बीएचएमएस करून तिने प्रॅक्टिस सुरू केली होती. मनोर वाडा भिवंडी या 64 किलोमीटरच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर आतापर्यंत शेकडो बळी गेले आहेत. मागील अनेक वर्षांपासून येथील स्थानिक रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात लढा देत आहेत. महामार्गावर लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरूच असून, या महामार्गावर खड्ड्यांमुळे गेलेला महिनाभरातील हा तिसरा बळी आहे. नेहाच्या मृत्यूने संतप्त झालेल्या नागरिकांनी वाडा-भिवंडी महामार्गावरील टोल नाकाही बंद केला आहे. ज्या ट्रकखाली नेहाचा अपघात झाला त्या ट्रकचा चालक पळून गेला आहे.