कडाव : प्रतिनिधी/बातमीदार
परतीच्या पावसाने भातपिकांचे मोठे नुकसान केल्याने कर्जत तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याची दखल घेत शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख शशिकांत मोहिते यांनी कर्जत तहसीलदारांना निवेदन सादर करत शेतकर्यांना एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. दसर्याच्या अगोदर कर्जत तालुक्यातील सर्व हळवी भातपिके कापण्यास तयार झाली होती, मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाची संततधार कायम राहिल्याने कापलेली भातशेती पाण्याखाली आली आहे. कणशीमधील भाताचा दाणा उखडणार असून उभे पीक शेतात आडवे पडून कुजणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कर्जत तालुक्यातील शेतकर्यांना एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन शशिकांत मोहिते यांनी बुधवारी (दि. 23) तहसील कार्यालयात दिले. या वेळी बजरंग श्रीखंडे, महेश थोरवे, भगवान जामघरे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.