खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या आयआरबी कंपनीच्या विविध विभागात काम करणार्या 179 कंत्राटी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या 18 वर्षांपासून काम करणारे हे कामगार विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. भूमिपुत्रांना टोल सुरू असेपर्यंत कामाची हमी, 1 एप्रिल 2019पासून प्रलंबित असलेली वेतनवाढ मिळावी, आयआरबीला चालू वर्षीपासून पुढे ठेका न मिळाल्यास 15 वर्षाची नुकसान भरपाई मिळावी, 18 वर्षापासून काम करणार्या कामगारांना नोकरीत कायम करावे या प्रमुख मागण्यांसाठी हे 179 कंत्राटी कामगार बेमुदत संपावर गेले आहेत.
नेरळमध्ये उद्या गुणवंतांचा सत्कार
कर्जत : आगरी समाज संघटनेच्या वतीने रविवारी (दि. 21) नेरळमधील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात कर्जत तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार केला जाणार आहे. या वेळी दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, तसेच विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्या आगरी समाजातील तरुणांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, केशव मुने, सचिव शिवराम बदे, खजिनदार शिवराम महाराज तुपे आदींनी केले आहे.
माणगावमध्ये उद्या पाककला स्पर्धा
माणगाव : येथील नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे रविवारी (दि. 21) दुपारी 3 वाजता कुणबी भवन सभागृहात पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या स्पर्धकास प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक महिलांनी आपली नावे 7756036771, 7887307686 किंवा 7788148272 या मोबाईल नंबरवर नोंदवावीत, असे आवाहन नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समिती सभापती रिया उभारे आणि उपसभापती माधुरी मोरे यांनी केले आहे.
संस्कार भारतीची गुरुपौर्णिमा
कर्जत : संस्कार भारती समिती कर्जत शाखेच्या वतीने जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. येथील मुलांना अभ्यासात अडचण आल्यास त्यांना आम्ही मार्गदर्शन व मदत करू, असे समितीच्या अध्यक्ष भारती म्हसे यांनी या वेळी सांगितले. आश्रमाचे निरीक्षक विनेश नवेथ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी आश्रमशाळेतील मुलांनी गाणी सादर केली. मुलांना छत्री व पुस्तके वाटप करण्यात आली. या वेळी ठमाताई पवार, समितीच्या उपाध्यक्षा बिनीता घुमरे, माधुरी दिघे, कीर्ती जोशी, मनीषा सुर्वे, दिनिती सावंत, मनीषा अथनीकर, माधुरी म्हात्रे, शलाका जोशी, पौर्णिमा चौधरी, लिना गांगल, छाया कुलकर्णी, गायत्री परांजपे, रूपाली मावळे, सुनीता साने, लता कुलकर्णी, पांडुरंग गरवारे, अरुण निघोजकर आदी उपस्थित होते.