नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांना दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतकर्यांना बळ देण्यासाठी रब्बी हंगामातील शेतमालाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळातील फेरबदलाचे निर्णय होण्याची शक्यता होती. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानुसार शेतकर्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतमालाच्या किमान आधारभूत मूल्यात सरकारने वाढ करीत शेतकर्यांना दिलासा दिला आहे. यात रब्बी हंगामातील शेतमालाच्या दरात 85 रुपयांची वाढ करण्यात आली असून, या वाढीनंतर गव्हाच्या किमतीत 1840 रुपयांवरून 1925 रुपये इतकी वाढ झाली आहे. शेतमालाच्या आधारभूत दरात वाढ केल्यामुळे सरकारवर तीन हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
– बीएसएनएल-एमटीएनएलचे विलीनीकरण आर्थिक संकटाचा सामना करणार्या बीएसएनएल आणि एमटीएनएलचे विलिनीकरण होणार आहे. केंद्राच्या कॅबिनेट बैठकीत या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली.