Breaking News

चिरनेर रोडवरील जुगाराच्या अड्ड्यावर कारवाईची मागणी

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील चिरनेर-खारपाडा रोडवरील आडोशी तलावाच्या समोर वीटभट्टीच्या जवळ अवैधरीत्या सुरू असलेल्या कित्येक हजारो रुपयांचा बाजार होत असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर उरण पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांसह महिला वर्गाकडून प्रामुख्याने करण्यात येत आहे.

चिरनेर येथील विजय मुंबईकर नामक इसम हा जुगाराचा अड्डा चालवीत असून, खोपटे येथील ज्ञानेश्वर पाटील आणि पागोटे येथील दिलीप पाटील यांच्या संगनमताने हा जुगाराचा अड्डा सुरू करण्यात आला असून, नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्यापासून सर्वच पोलीस अधिकार्‍यांचा आम्ही बंदोबस्त केला असून, तशा प्रकारची परवानगी आम्हाला मिळाल्याने आमच्या या धंद्यावर कोणताही पोलीस अधिकारी कारवाई करू शकत नाही, अशी दर्पोक्ती हा जुगाराचा अड्डा चालविणारे करीत आहेत. आज जिंकू, उद्या जिंकू या आशेवर जुगार खेळणारे तरुण आणि सामान्य घरातील कुटुंबप्रमुखाबरोबर शाळा कॉलेजातील तरुण वर्गही या जुगाराच्या अड्ड्याला बळी पडत असून, या जुगाराच्या अड्ड्यांमुळे अनेक महिलांचे संसार उघड्यावर पडले आहेत.त्यामुळे याचा त्रास समाजातील महिलांना सोसावा लागत आहे. जुगाराचा नाद लागलेल्या तरुणांनी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्रही विकायची पर्वा न बाळगल्याचे प्रकार झाल्याने येथील महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दररोज हजारो रुपयांची लूट करणार्‍या या जुगाराचा अड्डा चालविणार्‍यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करून या जुगाराच्या अड्ड्याला बळी पडणार्‍या पीडितांना या जुगाराच्या अड्ड्यापासून मुक्त करावे, अशी कळकळीची मागणी येथील सामान्य नागरिक आणि महिलांकडून करण्यात येत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply