Breaking News

कर्जत तालुक्यातील भातशेती पाण्यात

कर्जत : बातमीदार

परतीच्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील भाताची पिके भिजून शेतामध्येच आडवी झाली आहेत. त्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. दसर्‍यानंतर शेतकरी भाताच्या उभ्या पिकाची कापणी करून ते सुरक्षित ठिकाणी साठवण करून ठेवत असतो, मात्र यंदा तालुक्यातील अर्ध्या भागात भाताचे पीक शेतात कापून ठेवल्यानंतर परतीच्या पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्जत तालुक्यात सर्वत्र वादळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे भाताचे पीक खाली जमिनीवर आडवे झाले आहे. ते शेतात साचलेल्या पाण्यात भिजत आहे. जे भाताचे पीक उभे आहे, त्यातील दाणा पूर्ण क्षमतेने तयार झाला आहे. त्याला पावसाचा जोरात फटका बसून दाणे थेट जमिनीवर पडत आहेत. काही ठिकाणी तर भाताच्या दाण्याला मोड येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हाती काही पीक येईल, हे सांगणे कठीण आहे. कर्जत तालुक्यातील नेरळपासून कळंबपर्यंत असलेल्या प्रत्येक शेतात भाताचे पीक पाण्यात कोसळून, तर काही कापून ठेवलेले पाण्यात भिजत आहे. रेल्वे पट्ट्यात भाताची लावणी उशिरा होते आणि कापणीदेखील उशिरा होते, मात्र त्या ठिकाणी वादळाने भाताचे उभे पीक शेतात आडवे झाले आहे. हीच स्थिती दहिवलीपासून जांभिवली, वावलोली, कडाव भागात आहे. त्यात शेतात पाणी असल्याने पुन्हा कोंब फुटण्याची वेळ आली आहे. कशेळेपासून वाकस, कशेळे, जामरुंग, खांडस, नांदगाव या भागातही काही वेगळी स्थिती नाही.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply