अलिबाग : प्रतिनिधी
दिवाळी सण म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा अन् उत्साहाचा. लहान मुलांना फटाके, फराळाचे जेवढे आकर्षण असते तितकेच किल्ले बनवण्याचेही असते. आजकाल बाजारात तयार किल्ले उपलब्ध असले, तरी मातीचे किल्ले बनवण्याची मजा काही औरच. जिल्ह्याच्या अनेक भागात दिवाळीच्या दिवसांत बच्चेकंपनी किल्ले बनविण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व मोबाइल व्हिडीओ गेम्सच्या जमान्यात जुन्या परंपरा आजही टिकून आहेत. त्यापैकी एक म्हणजे किल्ला बनविणे. शहरांबरोबरच ग्रामीण भागात मुलांची किल्ले बनवण्यासाठी लगबग सुरू आहे. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला जिल्हा. जिल्ह्यात अनेक किल्ले आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. या किल्ल्यांचा इतिहास येथील लहान मुलांना, तरुणांना चांगला अवगत आहे. त्यामुळे दिवाळीत किल्ला बनवणे हे त्यांचे आकर्षण आहे.
किल्ला बनवण्यासाठी माती, दगड, विटा यांचा वापर केला जातो. ग्रामीण भागात किल्ल्यासाठी लागणारी माती मिळत असली, तरी शहरात माती उपलब्ध होणे कठीण जाते. त्यातच शहरी भागात इमारती उभ्या राहिल्या आहेत. असे असले तरी किल्ले बनवण्याची परंपरा लहान मुलांनी सुरू ठेवली आहे.
किल्ला बनविल्यानंतर त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून बाजूने मावळे, तोफा लावून किल्ल्याला सजविले जाते. विशेष म्हणजे दिवाळीच्या सुटीत रोज ही लहान मुले मावळ्यांप्रमाणे किल्ल्याची देखरेख
करीत असतात.