अनुष्काने सर्व आरोप फेटाळले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विश्वचषकादरम्यान बीसीसीआयच्या निवड समितीतील काही सदस्यांना मी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला चहा सर्व्ह करताना पाहिले, असा दावा करून भारताचे माजी यष्टिरक्षक फारूख इंजिनीअर यांनी खळबळ उडवून दिली असताना अनुष्का शर्माने ट्विटरवर एक विस्तृत पोस्ट लिहून आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिले आहे.
’भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची सध्याची निवड समिती ’मिकी माउस’ निवड समिती आहे. सध्या संघनिवडीचं काम विराटच करतो आणि निवड समितीचे सदस्य विराटची पत्नी अनुष्काला चहा सर्व्ह करण्याचे काम करतात’, अशा शब्दांत फारूख इंजिनीअर यांनी तोफ डागली होती. यावर अनुष्काने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
खोट्या आणि कपोलकल्पित बातम्यांकडे मी नेहमीच दुर्लक्ष करत आले आहे. मात्र, आता हे सगळे सहन करण्यापलीकडे गेले आहे. मी मौन बाळगल्यास माझ्याबाबत जे वारंवार खोटे बोलले जात आहे, ते लोकांना खरे वाटू लागेल. म्हणूनच मी या सर्वावर माझे म्हणणे मांडत आहे, असे नमूद करत अनुष्काने लग्नाआधीच्या आणि नंतरच्या चर्चेतल्या सर्व घटनांवर आपली बाजू मांडली आहे.