Breaking News

नेरळ ममदापूर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष

रस्त्यांची कामे मंजूर करण्याबाबत नेरळ ममदापूर विकास प्राधिकरण निरुत्साही

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील ममदापूर आणि कोल्हारे परिसराचा नियोजित विकास साधण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने नगरविकास विभागाच्या सूचनेने नेरळ-ममदापूर संकुल विकास प्राधिकरण स्थापन केले. गेल्या आठ वर्षात या प्राधिकरणमधून ममदापूर नागरी भागात रस्ते तयार करण्यात आले, मात्र हे रस्ते पाण्यात हरवले आहेत. येथील खड्डेमय रस्त्यामुळे सदनिका खरेदी करणार्‍या ग्राहकांची वाट बिकट झाल्याने बहुतांशी रहिवाशांनी ममदापूरमध्ये न राहणे पसंत केले आहे.

ममदापूर आणि कोल्हारे परिसरातील नागरी भागातील विकासाचे नियोजन नेरळ-ममदापूर विकास प्राधिकरण करणार होते. त्यासाठी येथील विकासकांकडून प्राधिकरण वेगवेगळ्या प्रकारचे कर वसूल करीत असते, मात्र 2013 पासून आतापर्यंत जेमतेम एक कोटी रुपयांचा निधी या भागातील विकास कामांवर खर्च करण्यात आला आहे.

ममदापूर परिसरात तब्बल 200 इमारती उभ्या राहिल्या असून तीन गृह प्रकल्पदेखील उभे राहिले आहेत, परंतु या भागात पायाभूत सुविधासाठी कोणताही निधी प्राधिकरण खर्च करीत नाही. त्यामुळे ममदापूर भाग समस्यांचे आगार बनले आहे. या नागरी भागातील चार किलोमीटर लांबीचे रस्ते एकदाही मजबूत पध्दतीने बनवले गेले नाहीत आणि त्यामुळे येथे राहणार्‍या लोकांचा प्रवास खड्ड्यातून सुरू आहे.

कर्जत-कल्याण राज्यमार्गावरून ममदापूर गावात जाणारा रस्ता जेथून सुरू होतो, तेथूनच खड्ड्यांतून प्रवास सुरु होतो. नेरळ जुने पोस्ट ऑफिस ते ममदापूर आणि पुढे भडवळ या रस्त्याचे डांबरीकरण अनेक वर्षे झाले नाही. नागरी भागातील दोन मुख्य रस्तेदेखील खड्ड्यात आहेत. अंतर्गत दोन रस्ते वगळता येथील सर्व रस्ते पावसाच्या पाण्यात हरवले आहेत.

ममदापूर नागरी भागात घर खरेदी करणार्‍यांची फसवणूक झाली आहे. नेरळ ममदापूर संकुल प्राधिकरण आम्हाला रस्त्याची पायाभूत सुविधादेखील पुरवित नाही. भरपूर इमारतींचे हे संकुल आहे, पण पावसाच्या पाण्याने भरलेले येथीले रस्ते पाहून आम्ही घाबरतो.

-मुनिफ ठाणगे, स्थानिक रहिवासी, ममदापूर, ता. कर्जत

नेरळ रेल्वे स्टेशनजवळ असल्याने आम्ही ममदापूरमध्ये घर खरेदी केले, परंतु काँक्रीटचे रस्ते, पाणी, गटारे, पथदिवे यापैकी येथे काहीही नाही आणि त्यामुळे आम्ही येथे घर घेऊन फसलो आहोत.

-श्वेता निळे, स्थानिक रहिवासी, ममदापूर, ता. कर्जत

ममदापूर नागरी भागातील आणि गावातून जाणार्‍या रस्त्याचे नियोजन रायगड जिल्हा परिषद आणि प्राधिकरण यांनी केले आहे. हे रस्ते कायमस्वरूपी मजबूत असावेत यासाठी प्राधिकरणचा प्रयत्न असून सर्व आराखडे तयार केले जात आहे. त्या सर्व प्रस्तावांना निधीची अडचण नाही, मात्र कागदोपत्री पूर्तता केल्यावर अंतिम स्वरूप येईल.

-आर. एस. देवांग, तांत्रिक अधिकारी, नेरळ-ममदापूर संकुल प्राधिकरण, अलिबाग

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply