मोहोपाडा : वार्ताहर
श्री विठ्ठल पायी कोकण दिंडी आयोजित स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य कांबेकर महाराज, सुखनिवासी गोमाजीबाबा गायकर, सुखनिवासी भगोजीबाबा, सुखनिवासी झिपरूबाबा, सुखनिवासी गणपतबाबा मुकादम, गुरुवर्य लक्ष्मण महाराज म्हसकर आणि गणेश सर यांच्या कृपाशीर्वादाने साजगाव येथे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. शिवव्याख्याते कीर्तनकार हभप संतोष महाराज सते यांच्या कुशल मार्गदर्शनाने भाताण येथून सलग आठव्या वर्षी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
हनुमान मंदिर भाताण येथून पंचायत समिती उपसभापती वसंत कठावले, सरपंच सुभाष भोईर, उपसरपंच अस्मिता काठावले यांनी दिंडीचालकांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यानंतर दिंडी पुढे मार्गस्थ झाली. या वेळी संजय काठावले यांनी आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी नाष्टापाण्याची सोय केली होती. सदर दिंडी धाकटी पंढरी सांजगाव येथे विठुरायाच्या चरणी पोहोचल्यानंतर हभप कीर्तनकार अनंत महाराज पाटील यांचे शुश्राव्य कीर्तन झाले.
या वेळी कीर्तनकार संभाजी महाराज, नारायण महाराज, काळूराम बाबा, भगवान ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, सुनील सते, अनिल सुनील पाटील, संजय काठावले, बाळाराम भोईर व पंचक्रोशीतील भाविक महिला युवक मोठ्या संख्येने दिंडीला उपस्थित होते. या वेळी सर्वांचे संतोष महाराज सते यांनी आभार मानले.