Breaking News

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक

पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यंदा या स्पर्धेचे 11वे वर्ष आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रूपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
नाट्य चळवळ वद्धींगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे चालत रहावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे ब्रीदवाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी नाशिक केंद्रावर 13 डिसेंबर, जळगाव केंद्रावर 14 व 15 डिसेंबर, पुणे केंद्र 19 ते 22 डिसेंबर, रायगड (पनवेल) 25 डिसेंबर तसेच मुंबई, ठाणे, कल्याण व इतर (पनवेल) केंद्राची प्राथमिक फेरी 26 ते 29 डिसेंबरपर्यंत होणार आहे, तर अंतिम फेरी 10 ते 12 जानेवारी 2025 रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.
या एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून 100हून अधिक एकांकिकांचा सहभाग असतो. नवनवीन संकल्पना आणि दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला आहे. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढला आहे. या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास एक लाख रुपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांक 75 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक 50 हजार रूपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 25 हजार रूपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच इतरही वैयक्तिक प्रकारचे पारितोषिके देऊन कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा नाट्य संस्था, कलाकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, स्पर्धा प्रमुख व पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply