माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी केली पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवीन पनवेलमधील आदई सर्कलजवळील राजीव गांधी मैदानात पनवेल महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राचे काम वेगाने सुरू असून शनिवारी (दि. 30) महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी अधिकार्यांसह तेथे पाहणी करून कामाचा आढावा घेतला तसेच कामासंदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या.
पनवेल महापालिकेच्या वतीने प्रभाग समिती ब, प्रभाग क्रमांक 16मधील भूखंड क्रमांक 28वर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी दिलीप वेंगसरकर फाउंडेशनशी करार करण्यात आला आहे.
या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे काम वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी केंद्राची पाहणी केली. या वेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती संतोष शेट्टी, माजी नगरसेवक समीर ठाकूर, महापालिकेचे अधिकारी संजय कटेकर तसेच किशोर चौतमोल, देवराम शार्दुल आदी उपस्थित होते.