दुबई : वृत्तसंस्था
न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर व्हाईटवॉश देत भारताने ऐतिहासिक टी-20 मालिका विजय साजरा केला. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने जागतिक क्रमवारी जाहीर केली. यात भारतीय फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंनी चमक दाखविली आहे.
फलंदाजांमध्ये हिटमॅन रोहित शर्मा आणि कॅप्टन विराट कोहलीला मागे टाकत के. एल. राहुलने दुसर्या स्थानी झेप घेतली आहे. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताची सलामीवीर जोडी राहुलने फलंदाज आणि यष्टीरक्षक अशा दोन्ही जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या. विशेष म्हणजे त्याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 56च्या सरासरीने 224 धावांची बरसात केली. यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. याच कामगिरीच्या जोरावर जागतिक क्रमवारीत त्याने सहाव्या स्थानावरून थेट दुसर्या स्थानावर झेप घेतली आहे.
राहुलसह टीम इंडियातील रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांच्याही रँकिंगमध्ये सुधारणा दिसून आली. हिटमॅन रोहितने तीन स्थानांची उडी घेत टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे, तर अय्यर आणि पांडे अनुक्रमे 55 आणि 58व्या स्थानावर पोहचले. अय्यरने 63, तर पांडेने 12 स्थानांची झेप घेतली आहे. कर्णधार विराट कोहली नवव्या स्थानी कायम राहिला.
गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह 26 स्थानांची झेप घेत 11व्या स्थानी विराजमान झाला आहे, तर फिरकीपटू युझवेंद्र चहल 30व्या आणि शार्दुल ठाकूर 57व्या स्थानी पोहचले आहेत. नवखा नवदीप सैनी आणि रवींद्र जडेजा हे अनुक्रमे 71 आणि 76व्या स्थानावर आहेत.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …