Breaking News

विकासपूर्व कामे अंतिम टप्प्यात, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याचा विश्वास

पनवेल : बातमीदार

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याच्या अगोदर करावयाची विकासपूर्व कामे अजून सुरूच आहेत. यात सर्वधिक महत्त्वाचे असलेले टेकडी सपाटीकरण, नदीचा प्रवाह बदलणे आणि दहा गावांचे स्थलांतर करून ती जागा मिळवून देणे ही कामे आता अंतिम टप्प्यात असून, या वर्षीच्या डिसेंबरअखेर ती पूर्ण होतील, असा विश्वास विमानतळाचे काम पाहणार्‍या सिडकोच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासपूर्व कामांना सिडकोच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. 1160 हेक्टर जागेवर 16 हजार कोटी रुपये खर्चून हे ग्रीन फिल्ड विमानतळ उभारले जात आहे. विमानतळासाठी लागणार्‍या एकूण जमिनीसाठी येथील टेकड्या फोडून सपाटीकरण करणे गरजेचे होते, तर या परिसरातून जाणार्‍या उलवा नदीचे पात्र बदलण्याचे महत्त्वाचे काम सिडकोला करणे गरजेचे होते, तसेच उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी भूमिगत करणे गरजेचे होते. याचप्रमाणे 10 गावांचे स्थलांतर करून त्यांचे पुनर्वसन करणे, हे महत्त्वाचे कामही होते. नदीचे पात्र बदलणे, टेकडी सपाटीकरण ही कामे अंतिम टप्प्यात असून, या डिसेंबरअखेर ती पूर्ण होतील, असा विश्वास विमानतळाचे काम पाहणारे सिडकोचे अधिकारी धायतकर यांनी व्यक्त केला आहे. ही कामे झाली की धावपट्टी उभारण्याचे काम जी. व्ही. के. इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करणार आहे, तोपर्यंत आमची कामे सुरूच आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तीन टप्प्यांत हे काम केले जाणार आहे. सन 2025पर्यंत तिसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply