लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस 51व्या चॅम्पियनशिप स्पर्धेत टेबल टेनिसपटू व सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वस्तिका संदीप घोष हिने एकेरी महिला गटात विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तिने ऑलिम्पिक खेळाडू श्रीजा अकुला हिचा पराभव करत देदीप्यमान कामगिरी केली. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाचे अभिनंदन केले.
24 ते 29 नोव्हेंबरदरम्यान चंदीगड येथील पंजाब विद्यापीठ जिम्नॅशियम हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये खारघर टेबल टेनिस अकादमी आणि सीकेटी कॉलेज पनवेलची विद्यार्थिनी असलेल्या स्वस्तिका घोषने भारतीय विमानतळ प्राधिकरणचे प्रतिनिधित्व केले. स्वस्तिका घोष सध्या भारतात महिला गटात 14व्या, तर जागतिक रँकमध्ये 128व्या क्रमांकावर आहे.
या स्पर्धेत स्वस्तिकाने तीन पदके जिंकली. महिला एकेरीमध्ये चॅम्पियन आणि महिला दुहेरीमध्ये उपविजेतेपद आणि सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. स्वस्तिका घोषच्या नेतृत्वाखाली भारतीय विमानतळ प्राधिकरण टीमने चमकदार कामगिरी करत या स्पर्धेत सर्वोच्च 120 गुण मिळवले. अंतिम फेरीत स्वस्तिकाने भारतातील रँक एक आणि जागतिक रँक 23ची ऑलिम्पियन खेळाडू श्रीजा अकुलाला 4-2 सेट स्कोअरने पराभूत केले आणि प्रथमच ती आंतर संस्थात्मक चॅम्पियन बनली.
या यशाबद्दल बोलताना स्वस्तिकाचे वडील आणि प्रशिक्षक संदीप घोष यांनी सांगितले की, या विजेतेपदामुळे स्वस्तिकाची रँक सुधारण्यास आणि भारतीय संघात पुन्हा निवड होण्यास मदत झाली आहे. 2021-22मध्ये स्वस्तिका भारतात चौथ्या क्रमांकावर होती. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले तसेच कॉमनवेल्थ इंडिया संघात पाचव्या क्रमांकाची खेळाडू ठरली आहे.
या आंतर संस्थात्मक टीटी चॅम्पियनशिपबरोबरच स्वस्तिकाने हरियाणा पंचकुला येथे 16 ते 22 नोव्हेंबरदरम्यान झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस चॅम्पियनशिप नॉर्थ झोन स्पर्धेत आणखी एक महत्त्वाचे कांस्यपदक जिंकले. त्यामुळे एकूणच स्वस्तिकाने यशाची घोडदौड सुरू ठेवली असून या स्पर्धा तिला आत्मविश्वास देणारे ठरले आहे.