Breaking News

नवीन पनवेल, कळंबोली अग्निशमन केंद्राचे सिडकोकडून पनवेल महापालिकेस हस्तांतरण

आपत्कालीन सेवेसाठी दक्ष राहावे -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
एमएमआर भागात सगळ्यात चांगल्या सेवा सुविधा पनवेल महापालिका देते याचा अभिमान आहे. आरोग्यसेवेच्या बाबतीत सर्वोत्तम सेवा देणारी म्हणून पनवेल महापालिकेकडे पाहिले जाते. त्याच पद्धतीने आपली मोठी उद्दिष्ट्ये ठेवून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या सर्व टीमने पनवेलकरांना अपेक्षित असलेले सहकार्य देऊन आपत्कालीन सेवेसाठी दक्ष राहावे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केले.
नवीन पनवेल अग्निशमन केंद्राचे सिडकोकडून पनवेल महापालिकेस हस्तांतरण करण्यात आले. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. या कार्यक्रमास आयुक्त मंगेश चितळे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, अनिल भगत, समीर ठाकूर, अजय बहिरा, प्रवीण पाटील, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खरगे, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे, अग्निशमन अधिकारी हरिदास सूर्यवंशी, उपअग्निशमन केंद्र अधिकारी संदीप पाटील, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे कळंबोली येथील अग्निशमन केंद्राचेही सिडकोकडून पालिकेला हस्तांतरण करण्यात आले.
या वेळी आयुक्त मंगेश चितळे म्हणाले की, पनवेल महापालिकेचा जास्तीत जास्त सुविधा देण्यावर भर असून सध्या अग्निशमन केंद्रातील कर्मचार्‍यांना पालिका क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुसार रेस्क्यू ट्रेनिंग दिले जात आहे. याबरोबरच महापालिका कार्यक्षेत्रात अद्ययावत अग्निशमन सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध उपकरणे पालिका लवकरच खरेदी करणार आहेत.
या अग्निशमन केंद्रांच्या हस्तांतरणाने पालिकेकडे हक्काची आता पनवेल, कळंबोली, नवीन पनवेल असे तीन अग्निशमन केंद्र झाली आहेत. आज नवीन पनवेल व कळंबोली येथील अग्निशमन केंद्रांतील प्रत्येकी दोन अग्निशमन वाहनांसमवेत हस्तांतरण करण्यात आले असून नुकत्याच झालेल्या भरतीदरम्यान पालिका अग्निशमन विभागात 110 अग्निशमन कर्मचार्‍यांची भरती करण्यात आलेली आहे. या कर्मचार्‍यांना पालिका क्षेत्रातील संभाव्य धोके, नदी, इमारती या सर्वांचा विचार करून प्रशिक्षण देण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त कैलास गावडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे यांनी मानले.

Check Also

नवीन पनवेलमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे काम वेगाने सुरू

माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी केली पाहणी पनवेल ः रामप्रहर …

Leave a Reply