Breaking News

395 हेक्टर भातशेतीचे पंचनामे पूर्ण उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची माहिती

उरण : प्रतिनिधी

भाताचे कोठार संबोधिले जाणार्‍या उरण तालुक्यातील जासई, चिर्ले, जांभूळपाडा, वेश्वी, दिघोडे, विंधणे, टाकीगाव, धाकटी जुई, बोरखार, चिरनेर, रानसई, कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली विभागतील खोपटे, पिरकोन, वशेणी, पुनाडे, केळवणे, आवरे यासह चाणजे विभागातील करंजा, केगाव, नागाव आदी गावांतील महसुली गावातील 1194 शेतकर्‍यांच्या सुमारे 395.87 हेक्टर जमिनीच्या भातशेतीचे पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.

सर्वप्रथम उरणचे तहसीलदार यांनी संपूर्ण तालुक्यातील अवकाळी पावसामुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर संबंधित गावातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी संयुक्तरीत्या पाहणी करून पंचनामे पूर्ण केले आहेत. या पूर्ण झालेल्या पंचनाम्यांचा अहवाल रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे, तर शासन नियमानुसार मंजुरी आल्यानंतर या उरण तालुक्यातील शेतकर्‍यांना भातशेतीच्या नुकसानी रकमेचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

एकंदरीत आजच्या परिस्थितीत येथील शेतकर्‍यांना न परवडणारी शेती करणे अतिशय खर्चिक बाब बनली असून, यापूर्वी शेतकरी एकमेकांच्या शेतीच्या मशागतीसाठी जाण्याची परंपरा होती, मात्र सध्या शेतीसाठी लागणारी पारंपरिक अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावर असून, बैलांचा आणि रेड्यांचा नांगर दुर्मिळ झाला असून, गावोगावी पाळीव प्राण्यांचे प्रमाण अतिशय कमी झाले असून, शेतीला शेणखत मिळण्याऐवजी रासायनिक खतांचा सर्रास वापर करण्यात येतो. रासायनिक खत व शेतीच्या मशागतीसाठी मजुरांची कमतरता भासत आहे. त्यातच भात काढणीच्या दिवसातच पावसाचे थैमान सुरू झाल्याने कधी नव्हे एवढे नुकसान यंदा झाले असून भातपिक अवकाळी पावसाच्या पाण्याखाली बुडून कुजल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply