पनवेल : बातमीदार
वयोवृद्ध महिला व पुरुषांना एकटे असल्याचे पाहून व त्यांना बोलण्यात गुंतवून फसवणूक करणार्या आरोपींपैकी एका आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी उत्तराखंड येथून अटक केली आहे. त्याच्यावर तब्बल दीडशेहुन अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी कडून तीन लाख 61 हजार रुपयांचे 12 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
नवीन पनवेल व खांदा कॉलनी परिसरात वयोवृद्ध महिला व पुरुषांना एकटे असल्याचे पाहून अज्ञात आरोपी त्यांना हेरायचे व त्यांना आपण हरिद्वार येथील पंडित असून त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील दागिने घेऊन पोबारा केल्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. अशाच प्रकारे शिवा कॉम्प्लेक्सजवळ एका गृहस्थाला बोलण्यात गुंतवून आरोपीनी आपण पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या वयोवृद्धपणाचा फायदा घेतला व त्याच्याकडील दागिने घेऊन त्यांनी पोबारा केला होता. या प्रकारांमुळे खांदा कॉलनी व नवीन पनवेल परिसरात घबराट निर्माण झाली होती. याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली. वपोनी योगेश मोरे, पोलीस निरीक्षक डीडी ढाकणे यानी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या वेळी गुन्हे करणारे चार आरोपी हे दोन मोटारसायकलवर येताना त्यांना दिसले. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यातील एक आरोपी उत्तराखंड येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक वैभवकुमार रोंगे, पोलीस हवालदार परशुराम केंगार, बाबाजी थोरात, अनिल पाटील, जयंत यादव, पोलीस नाईक महेश कांबळे, पोलीस शिपाई चेतन घोरपडे, महेश अहिरे, जयेश पाटील, चित्तेश वळवी यांचे पथक उत्तराखंड येथे दाखल झाले. पोलिसांनी उत्तराखंड येथून फिरोज मोजुद्दीन याला अतिसंवेदनशील परिसरातून ठंडा नाला, (उत्तराखंड) येथून ताब्यात घेतले. त्याच्यावर खांदेश्वर, कळंबोली, वाशी, मुंबई येथे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील तीन आरोपी फरारी आहेत.
यातील आरोपी हे हातातील अंगठ्यांमध्ये वापरण्यात येणारे खडे विक्रीचा व्यवसाय करतात. ते रस्त्यामध्ये एकट्या चालणार्या वयस्कर व्यक्तीला गाठून त्यांना बोलण्यात गुंतवतात व हातचलाखीने त्यांच्याकडील दागिने घेऊन ते पसार होतात. अटक केलेला आरोपी व फरारी आरोपींवर अशाच प्रकारे महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, बिहार येथील भिलवाडा, बाराकोटा, चित्तोडगड, उदयपूर, अजमेर, मदनगंज, किशनगढ, दौसा, बरेली, गोरखपूर, बस्ती, अकबरपूर, सुलतानपूर, गौंधा, अजमगढ, इलाहाबाद, माओ, बहराइच, पटना येथे 150 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.