Breaking News

संगणकीय नेत्रविकार

आरोग्य प्रहर

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करीत आहे. त्यामुळे तरुणवर्गामध्ये डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रुपटल कोरडे होऊन डोळ्यांत कोरडेपणा जाणवतो. डोळ्यांची आग होणे, थकवा जाणवणे, नजर कमी होणे आदी त्रासदायक लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. संगणकाच्या अतिवापराने अश्रुपटल कोरडे होण्यासोबतच एका विशिष्ट अंतरावर सातत्याने नजर केंद्रित केल्याने डोळ्यांमधील बाहुलीचे स्नायू थकतात. त्यामुळेदेखील त्रास जाणवायला सुरुवात होते. संगणकाच्या वापरामुळे डोळ्यांना होणार्‍या या त्रासाला कॉम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोम म्हणतात.

दिवसांतून दोन-तीन तासांहून अधिक काळ संगणकासमोर बसून काम करणार्‍या व्यक्तींनी दर 20-30 मिनिटांनंतर चार-पाच मिनिटे डोळे बंद करून विश्रांती घ्यावी. हे शक्य नसल्यास कार्यालयाच्या खिडकीमधून लांबवर पाहावे. या काळात मोबाइल किंवा अन्य गॅझेटस पाहू नयेत. काम करीत असताना जाणीवपूर्वक डोळ्यांची उघडझाप करावी. काम करण्याच्या ठिकाणी वातानुकूलित वातावरण असल्यास एसीचा झोत थेट चेहर्‍यावर येणार नाही याची काळजी घ्यावी. एसीचा झोत चेहर्‍याकडे येत असल्यास त्याची दिशा बदलावी, जेणेकरून त्यामुळे डोळ्यांना अजून कोरडेपणा येणार नाही. या दैनंदिन सवयी बदलल्या तरी डोळ्यांचे आजार बर्‍यापैकी कमी होण्यास नक्कीच मदत होते. या बाबी अमलात आणूनही डोळ्यांना त्रास जाणवत असल्यास मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोळे सातत्याने कोरडे पडत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉपचा वापर करण्यास हरकत नाही. मोबाइल किंवा संगणकाची स्क्रीन आणि डोळे यामध्ये अंतर ठेवून शक्यतो काम करावे. हे अंतर काही वेळाने बदलत राहावे, जेणेकरून डोळ्यांवर शक्य तितका कमी ताण येतो. मोबाइल किंवा संगणकाच्या स्क्रीनचा प्रकाश (ब्राइटनेस) डोळ्यांना त्रासदायक ठरणार नाही इतका कमी ठेवावा. मोबाइल आणि लहान मुले हे गणित आता न सुटणारे झाले आहे. अगदी दोन महिन्यांचे बाळही रडताना मोबाइल दाखवला की शांत होते. प्रत्येक लहान मुलाची वयाच्या तिसर्‍या वर्षी डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात डोळ्यांना होणारा संभावित धोका वेळीच लक्षात येऊन उपाय करणे शक्य असते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply